मालवणातील व्यापाऱ्यांची महावितरणवर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणातील व्यापाऱ्यांची महावितरणवर धडक
मालवणातील व्यापाऱ्यांची महावितरणवर धडक

मालवणातील व्यापाऱ्यांची महावितरणवर धडक

sakal_logo
By

०३८३०

मालवणातील व्यापाऱ्यांची महावितरणवर धडक
वीजपुरवठा वारंवार खंडित ः अधिकाऱ्यांकडून सुरळीत करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : गेले आठवडाभर शहरातील बाजारपेठेतील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाने येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांची विद्युत उपकरणे जळाल्याने व्यापारी वर्गाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी शहरातील विद्युतपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येईल त्याचबरोबर अन्य दुरूस्तीची कामे रविवारी करण्यात येतील, अशा प्रकारचे आश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता गुरूदास भुजबळ यांनी व्यापारी वर्गाला दिले आहे.
सध्या शहरात पर्यटन हंगाम आहे. शहरात पर्यटकांची गर्दी असते. अशा परिस्थितीत बाजारपेठेतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाची उपकरणे जळाली आहेत. या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी अभियंता भुजबळ यांनी लवकरात लवकर बाजारपेठेतील वीजपुरवठ्याच्या समस्या दूर करण्यात येतील. तसेच बाजारपेठेतील दुरूस्तीची कामे रविवारी करण्यात येतील असेही स्पष्ट केले. यावेळी व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे म्हणाले, जून महिन्यात पावसाचे आगमन होते. मालवण किनारपट्टीला सातत्याने वादळांचा धोका असतो व भविष्यात तो राहणार आहे. त्यामुळे भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम होणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. यावेळी व्यापारी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, शहराध्यक्ष उमेश नेरूरकर, बाळू अंधारी, मेघनाद धुरी, साईश बांदेकर, कुलराज बांदेकर, यशराज तायशेटे, निहार सापळे, कुणाल मालवणकर, हेमंत शिरपुटे, सरदार ताजर, विद्या मेस्त्री आदि उपस्थित होते.