शिरगाव, निवळी, गोळप, मिर्‍या येथे शिवसेनेचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगाव, निवळी, गोळप, मिर्‍या येथे शिवसेनेचे वर्चस्व
शिरगाव, निवळी, गोळप, मिर्‍या येथे शिवसेनेचे वर्चस्व

शिरगाव, निवळी, गोळप, मिर्‍या येथे शिवसेनेचे वर्चस्व

sakal_logo
By

४३ ( पान ३ साठी)


शिरगाव, निवळी, गोळप, मिऱ्‍यात शिवसेनेचे वर्चस्व

चार ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक ; ठाकरे गटाला धक्का

रत्नागिरी, ता. १९ ः तालुक्यात चार ग्रामपंचायतींमध्ये चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात शिवसेनेने चारही जागांवर विजय मिळवत ठाकरे गटाला धक्का दिला. हा निकाल शिंदेंच्या शिवसेनेचा उत्साह वाढवणारा आहे.
रत्नागिरी तालुक्यामध्ये शिरगाव, निवळी, गोळप व मिऱ्‍या येथे पोटनिवडणूक झाली. गुरुवारी अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले होते. तालुक्यातील शिरगाव येथे सरपंच फरिदा काझी यांनी प्रभाग १ मधूनही विजय मिळवला होता. त्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागली. तेथे इम्तियाज अ. रहिमान मुजावर, सिद्धेश चंदू खेत्री आणि हामजा हुना यांच्यात तिरंगी लढत होती. इम्तियाज मुजावर यांच्याकडून सरपंच फरिदा काझी व रज्जाक काझी यांनी पदाधिकारी जोरदार प्रचार केला तर शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या हामजा हुना यांच्याकडून उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, अजिम चिकटे व पदाधिकारी पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. आज मतमोजणी झाल्यावर इम्तियाज मुजावर यांना २३६ तर विजयी उमेदवार हामजा हुना यांना २५१ मते मिळाली. सिद्धेश खेत्री यांना ११० तर नोटाला ६ मते मिळाली. शिरगावमध्ये त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. शिरगावप्रमाणेच गोळप ग्रामपंचायत निवडणूकही अटीतटीची होईल अशी अपेक्षा होती; परंतु शिवसेनेच्या रफिका तांडेल यांनी ३६१ मते घेत साबिया फणसोपकर यांचा एकतर्फी पराभव केला. फणसोपकर यांना अवघी २६ मते मिळाली. शिवसेना विभागप्रमुख नंदा मुरकर व त्यांच्या सहकाऱ्‍यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. गोळपमध्येही पालकमंत्री सामंत यांचेच वर्चस्व आहे.
निवळीमध्येही जोरदार लढत होती. तेथे वैशाली पवार यांनी १६२ मते घेत अवघ्या चार मतांनी तन्वी सावंत यांचा पराभव केला. सावंत यांना १५८ मते मिळाली तर नोटाला १३ मते मिळाली. मिऱ्‍या येथील निवडणूकही अटीतटीची झाली. या ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळाली. गुरूप्रसाद माने यांनी सर्वाधिक १६० मते घेत विजय मिळवला तर विरोधात उभे राहिलेल्या राकेश सावंत यांना १४८, मकरंद सावंत यांना १२६ तर अजित सावंत यांना ६२ मते मिळाली. या ठिकाणी नोटाला एकही मत मिळाले नाही. पोटनिवडणुकीत चारही ग्रामपंचायतीत शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे.
----
पोट बातमी

गोळप पोटनिवडणुकीत शिवसेनेतच बंडखोरी

मंगेश साळवी ; ठाकरे गटाने उमेदवारच दिलेला नाही

पावस ः गोळप ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही उमेदवार उभा केला नव्हता. शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) पॅनेलमध्ये बंडखोरी झाली आणि त्याच पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर होते. त्यामुळे त्यांच्याशी ठाकरे गटाचा कोणताही संबंध नाही, असे ठाकरे गटाचे माजी सभापती मंगेश साळवी यांनी सांगितले.
प्रभाग एकच्या मुस्लिम मोहल्ला परिसरात ग्रामपंचायत सदस्य श्रीमती फणसोपकर यांना शासकीय नोकरी लागल्यामुळे त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या एका जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ठाकरे गटाने उमेदवार उभा केलेला नाही. शिवसेनेच्या पॅनेलच्या वतीने अधिकृत उमेदवार उभा केला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध ज्या सदस्याने पदाचा राजीनामा दिला त्याच पदासाठी तिची बहीण साबिया फणसोपकर यांनी बंडखोरी करून अर्ज भरला. त्यामुळे एकाच पक्षाच्या दोन उमेदवार रिंगणात होत्या. ही बंडखोरी शिवसेना मोडीत काढू शकली नाहीत. ठाकरे गटाने जर उमेदवार उभा केला असता तर या पोटनिवडणुकीमध्ये आणखी रंगत आली असती. त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा कोणताही संबंध नाही, असे ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य व माजी सभापती मंगेश साळवी यांनी सांगितले.