
''जैतिर''च्या भेटीला भाविकांचा सागर
03867
तुळस ः येथील श्री देव जैतिरचा वार्षिकोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला. श्री देव जैतिराने अवसारी मांडावर येत खेळ केला. यावेळी भाविकांची झालेली गर्दी.
‘जैतिर’च्या भेटीला भाविकांचा सागर
उत्सावाला प्रारंभ; ११ दिवस चालणार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १९ ः दक्षिण कोकणातील तुळस येथील प्रसिद्ध देवस्थान नराचा नारायण म्हणजेच माणसाचा देव श्री देव जैतिराच्या वार्षिक उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. जिल्ह्यासह रत्नागिरी मुंबई आणि कर्नाटक, गोव्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती.
जैतिर हे तुळस गावचे प्रमुख दैवत आहे. उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, तसेच फुलांची सजावट केली आहे. आदल्या दिवसापासूनच मंदिर परिसरात बाजारपेठ भरण्यास सुरुवात झाली होती. उत्सवादिवशी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, खेळणी, गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळाजवळ आल्याने शेतीच्या अवजारांची तसेच शेतकरी वर्गाला उपयोगी अशी बाजारपेठ याठिकाणी भरते. दुपारी दोननंतर खऱ्या अर्थाने उत्सवाला रंगत आली. श्री देव जैतीर अवसारी मांडावर येत खेळ केला, तर यानंतर मनाप्रमाणे प्रत्येक मानकऱ्यांनी मांडावर खेळ केला. हे दृश्य पाहायला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता २८ मे रोजी कवळासाने होणार असून, पुढील ११ दिवस गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे. या उत्सवानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता देवस्थान समिती, तसेच गावकर मंडळी व ग्रामस्थांतर्फे नियोजन केले आहे. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तही आहे. खासदार विनायक राऊत, विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम यांनी देवाचे दर्शन घेतले.