
पडवे-वराड-कुडाळ रस्ताकामास प्रारंभ
पडवे-वराड-कुडाळ रस्ताकामास प्रारंभ
मालवण ः आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पडवे-सावरवाड-वराड-तिठा-कुडाळ मार्ग खडीकरण, डांबरीकरण (५ लाख), साळेल मुख्य रस्ता ते मराठी शाळेपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण (५ लाख) कामांचा प्रारंभ काल (ता. १९) आमदार नाईक यांच्या उपस्थितीत झाला. उर्वरित कामे लवकरच मार्गी लावली जाणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. वराड येथे किशोर भगत, अशोक परब, आप्पा आळवे, उपसरपंच गोपाळ परब, ग्रामपंचायत सदस्य आप्पा परब, आप्पा पुरळकर, संतोष माडगूळ, वामन मयेकर, साळेल येथे सरपंच रवींद्र साळकर, उपसरपंच नाना परब, सदस्या संपदा गावडे, सिद्धी पवार, समीर गावडे, विवेकानंद पेडणेकर, समीर गावडे, राजू मासये, राजाराम गावडे, भानजी गावडे, विजय गावडे, सुचिता पडवळ, केशव जाधव, संदेश गावडे, नीलेश गावडे, संतोष गावडे, गणेश गावडे, गणपत पडवळ, सुदर्शन पवार, साक्षी जाधव आदी उपस्थित होते.
-----------------
सावंतवाडीत २७ पासून कॅरम स्पर्धा
सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा २७ व २८ मे रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे होणार आहे. ही स्पर्धा जिल्हास्तरीय खुल्या गटात (पुरुष व महिला) खेळविण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी राजेश निर्गुण (सावंतवाडी), शुक्राचार्य म्हाडेश्वर (कुडाळ), ओंकार कुबल (वेंगुर्ले), पांडुरंग पाताडे (कणकवली), प्रकाश प्रभू (देवगड) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी योगेश फणसळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
-----------------
वेंगुर्लेत २५ पासून नाट्य महोत्सव
वेंगुर्ले ः नाटककार मधुसुदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व येथील नगरपरिषदेच्या १४७ व्या वर्धापन दिनानिमित्त नगरपरिषदेमार्फत २५ ते २८ मे दरम्यान कॅम्प येथील मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. हा नाट्यमहोत्सव प्रेक्षकांसाठी मोफत आहे. २५ ला सायंकाळी सहाला तालिम निर्मित गो. पू देशपांडे लिखित व विपुल महागावकर दिग्दर्शित ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, २६ ला सायंकाळी सहाला युवराज पाटील लिखित व शिवाजी पाटील दिग्दर्शित ‘येस आय ब्लीड’, २८ ला शंतनु पाटील दिग्दर्शित ‘गगन दमामा बाजो’ नाटक होणार आहे. भगतसिंग यांच्या जीवनावर हे नाटक आहे. या नाटकाने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा आणि कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहे. नाट्यमहोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--
झारापला २८ पासून गणेशमूर्ती कार्यशाळा
सावंतवाडी ः झाराप येथील भगिरथ प्रतिष्ठान येथे २८ व २९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात ५० मूर्तिकारांना प्रवेश दिला जाणार आहे. पेण येथील ज्येष्ठ मूर्तिकार श्रीकांत देवधर प्रमुख मार्गदर्शक आहेत. मूर्ती बनविण्यासाठी लागणारी शाडू माती कार्यशाळेमध्ये पुरविली जाईल. मूर्ती घडविण्यासाठी लागणारे साहित्य आणायचे आहे. अधिक माहितीसाठी बापू सावंत, विलास माळगावकर, नवीन मालवणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. प्रसाद देवधर यांनी केले आहे.