
जि. प. तील गट क मधील 700 जागा रिक्त
पान ५ साठी)
गट क मधील ७०० जागा रिक्त
जिल्हा परिषदेत भरती लवकरच; वयोमर्यादेचे निकष जाहीर
रत्नागिरी, ता. २० ः जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्या दृष्टीने ग्रामविकास विभागाकडून हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हा परिषदेंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याचे अध्यादेश आले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत सुमारे ७०० पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. त्याची चाचपणी सुरू झाली असून, दोन दिवसात अंतिम आकडा निश्चित होईल. भरतीसाठी डिसेंबर २०२३ पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही ४० आणि मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मंजूर रोस्टरनुसार दोन दिवसांत रिक्त जागांचा तपशील मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साधारण ७०० पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांपैकी चार विभागांचे रोस्टर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासणी करण्यात आले असून त्याला मान्यता मिळणार आहे. रिक्त जागा अंतिम झाल्यावर झेडपीचा सामान्य प्रशासन विभाग राज्य शासनाच्या मान्यतेने भरतीसाठी या महिनाअखेर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. दुसरीकडे होणाऱ्या संभाव्य भरतीसाठी ग्रामविकास विभागाने सविस्तर अध्यादेश काढला आहे. यात भरतीमधील उमेदवारांच्या वयोमर्यादादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत.
कोविडमुळे दोन वर्षे वाया गेल्याने जिल्हा परिषद भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमदेवारांसाठी दोन वर्षे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहेत. भरतीसाठी राबवण्यात येणारी कार्यप्रणाली, ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षा, त्यांची गुणवत्ता यादी, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, पेसा (अनुसूचित क्षेत्रातील) सरळसेवा पदांबाबत, भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश याबाबतची कार्यप्रणाली ग्रामविभागाने निश्चित केली असून जिल्हा निवड समितीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या भरतीवर विभागीय महसूल आयुक्त यांचे नियंत्रण राहणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.