
Uday Samant : गाळ काढण्यासाठी 50 लाख तातडीने देणार; उदय सामंत
चिपळूण : पावसाळा नियमित सुरू होईतोपर्यत वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम थांबता कामा नये. निधीअभावी गाळ काढण्याचे काम रखडणार नाही. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एक दिवस काम थांबले होते. गाळ काढण्यासाठी दोन टप्प्यात ५० लाखांचा निधी तातडीने देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण बचाव समिती पदाधिकाऱ्यांशी बोलताना चिपळुणात दिली.
येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिरात वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा पालकमंत्री सामंत यांनी घेतला. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी प्रवीण पवार, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, जलसपंदाचे अभियंता खोत, बचाव समितीचे अरूण भोजने, किशोर रेडीज, रामशेठ रेडीज, शहानवाज शाह, नामचे समीर जानवलकर, सीमा रानडे आदी उपस्थित होते.
या वेळी भोजने यांनी गाळाबाबत सद्यःस्थितीची माहिती पालकमंत्र्यांना दिली. निधी अपुरा पडत असल्याने लोक आता वर्गणी काढू लागले आहेत. हा मुद्दा उपस्थित करताच चव्हाण म्हणाले, ‘‘वर्गणी गोळा करण्याच्या मुद्द्यावरून पालकमंत्री सामंत यांच्यासोबत आपला वाद झाला व तत्काळ आपण शासनाकडे गाळ काढण्यासाठी २५ लाखाची मागणी केली.
शासन निधी देत असताना वर्गणी गोळा करण्याची गरज काय?’’ त्याला दुजोरा देत सामंत म्हणाले, ‘‘कोणालाही गाळ काढण्याच्या कामास वर्गणी गोळा करण्याची गरज नाही. पहिल्या टप्प्यात ५० लाखांची तरतूद करण्यात येईल. त्यातील ३० लाख तत्काळ देण्याची व्यवस्था होईल.
चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी व गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. पुढच्या कालावधीत मंजूर झालेला पावणेतीन कोटीचा निधीदेखील मिळेल, असे सांगितले.’’ पाटबंधारे विभागाचे अधिकारी सहकार्य करत नसल्याची तक्रार बचाव समितीने केली.
त्यावर सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना झापले. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एक दिवस काम बंद राहिले. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याआधी दुसऱ्या टप्प्याकडे निधी का वळवला, याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी सारवासारव करून उत्तर दिले.
पूररेषेबाबत मुख्यमंत्री घेणार बैठक
चिपळुणातील लाल व निळ्या पूररेषेचा मुद्दा सातत्याने वादग्रस्त राहिला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बैठक घेणार आहेत. आपल्या माध्यमातून लवकरच या बैठकीचे आयोजन केले जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
गाळाबाबत २२ ला बैठक
वाशिष्ठीच्या पुढील टप्प्यातील गाळ काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यासोबत २२ मे रोजी चिपळुणातच बैठकीचे आयोजन केले जाईल. या वेळी गाळ काढण्याबाबत विविध परवानग्या व वाशिष्ठीतील गाळाचे सर्व्हेक्षण करण्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.