गौण खनिजाची राजरोस वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौण खनिजाची राजरोस वाहतूक
गौण खनिजाची राजरोस वाहतूक

गौण खनिजाची राजरोस वाहतूक

sakal_logo
By

04003
प्रसाद गावडे

गौण खनिजाची राजरोस वाहतूक

प्रसाद गावडे; सुसाट डंपरना वाली कोण?

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवून रात्री दहानंतरही खुलेआम गौण खनिज वाहतूक होत असून त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे, अशी खंत मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी व्यक्त केली. तसेच सुसाट डंपरमुळे होणाऱ्या अपघातांना वाली कोण?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गावडे यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परराज्यात होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या वेळेच्या निर्बंधांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे उघड होत असून रात्री दहानंतरही खुलेआम अवैध वाहतूक होताना दिसत आहे. या वाहतुकीला पोलिस प्रशासनाकडूनच सहकार्य केले जात आहे की काय, असा प्रश्न असून पोलिसांच्या एकूणच भूमिकेबाबत साशंकता आहे. महसूलचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे ‘मॅनेज’ झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. अलीकडेच जिल्ह्यात सुसाट डंपरमुळे घडलेले अपघात व त्यात झालेले मृत्यू पाहता लोकांच्या जिवापेक्षा वाळू, चिऱ्यांनाच अधिक किंमत आहे, असे दिसून येते. प्रशासकीय यंत्रणा एवढी हतबल होण्यामागे पालकमंत्री, आमदार, खासदारांची जनतेप्रती असलेली अनास्था कारणीभूत असून जिल्हा अक्षरशः पोरका झालेला भासत आहे. गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका डंपरने धामापूर ते नेरूर दरम्यान एका मोटारीला धडक दिल्याने संतप्त मोटार चालकाने व्हायरल केलेल्या व्हिडिओत मध्यरात्री होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीचा पर्दाफाश झाला आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची सीसीटीव्ही यंत्रणा देखील कुचकामी ठरत असून सुसाट डंपर वाहतुकीमुळे जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी व अपघातात जखमी झालेल्या लोकांनी न्यायासाठी कोणाकडे अपेक्षा करावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने यात लक्ष देण्याची गरज आहे, असे मत गावडे यांनी व्यक्त केले आहे.