
१७८ चालक, वाहकांना एसटीकडून ‘टीटीएस’
१७८ चालक, वाहकांना एसटीकडून ‘टीटीएस’
कणकवली ः राज्य एसटी कष्टकरी जनसंघाच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग विभागातील १७८ चालक तथा वाहकांना तात्पुरत्या समय वेतन श्रेणीत (टीटीएस) घेण्यात आले आहे. दोन-तीन वर्षांपासून हे आदेश प्रलंबित होते. एसटी कष्टकरी जनसंघ सिंधुदुर्ग विभागाच्या माध्यमातून याबाबत कार्यवाहीची मागणी करत उपोषणाची नोटीस दिली होती. या वेळी विभाग नियंत्रकांनी चर्चेला बोलावून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग विभाग एसटी प्रशासनाने त्या सर्व कर्मचाऱ्यांचे टीटीएसचे आदेश जारी केले. याबाबत विभाग नियंत्रक अभिजित पाटील, विभागीय यंत्र अभियंता वासकर तसेच आस्थापना शाखेतील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचे जनसंघाच्या माध्यमातून अध्यक्ष अनंत (अमित) रावले आणि सचिव गणेश शिरकर यांनी आभार मानले आहेत.
--
‘भूविकास’च्या कर्मचाऱ्यांना सात वर्षांचा थकीत पगार
कणकवली ः राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे सात वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम कमर्चाऱ्यांना दिली आहे. त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तसेच सातत्याने अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्याने न्याय मिळाल्याचे भूविकास बँकेचे कर्मचारी उत्तम राणे, चंद्रकांत सरंगले यांनी सांगितले. गुरुवारी त्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७१ कर्मचार्यांची १४ कोटी ५५ लाख २३ हजार एवढी रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.