क्रिकेट खेळातील मशिनरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट खेळातील मशिनरी
क्रिकेट खेळातील मशिनरी

क्रिकेट खेळातील मशिनरी

sakal_logo
By

२० (टुडे ३ साठी, सदर)

१६ मे टुडे तीन

-rat२२p१०.jpg-
२३M०४२५४
संतोष गोणबरे
--

टेक्नो----------लोगो

क्रिकेट खेळातील मशिनरी

आपल्या भारत देशात कशा-कशाला महत्व दिले जाते, याचा काही नेम नसतो. कोणत्याही ‘गेम’मध्ये ‘नेम’ धरून एखादी क्रिया करावी तर त्याचा आनंद काय वर्णावा? लगोरी ते विटीदांडू हे पारंपरिक खेळ असोत की हॉकी ते फुटबॉल हे राष्ट्रीय स्तरावरचे खेळ असोत, सर्वांमध्ये ठरवून नेम धरला जातो आणि इच्छित उद्दिष्ट पूर्ण करून विजयी गेम केला जातो. क्रिकेट या खेळाला आपल्या देशात असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता त्यामध्ये कालानुरूप होत गेलेले बदल आणि तंत्रज्ञानाचा होत राहिलेला अनिवार्य वापर हेच दर्शविते की खेळ फक्त सरळसोट पद्धतीने न खेळता त्यात जर तंत्रज्ञानाचा बेमालूम वापर केला तर त्याच्या प्रसिद्धीचा आलेख उंच शिखरावर जाऊन पोचतो. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ सामने सुरू होत असताना टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनच्या समोर खिळून राहणाऱ्या क्रीडाप्रेमींना या खेळात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती व्हायलाच हवी, नाही का?

- संतोष गोणबरे, चिपळूण
--

क्रिकेट या खेळाची सुरवात १६ व्या शतकात इंग्लंडमधील ग्रामीण भागात झाली. १७ व्या शतकात कृषी अवजारांचा वापर करून तरुण मंडळी हा खेळ खेळत असत. गंमत म्हणजे १६११ साली दोन मुलांना चर्चला जाण्याऐवेजी क्रिकेट खेळल्यामुळे अटक करण्यात आली होती. पुढे हा खेळ लोकप्रिय होतानाच सट्टाबाजार आणि जुगारी लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरला. त्यातूनच काउंटी क्रिकेटची सुरवात झाली. कसोटी क्रिकेटची सुरवात १९०९ मध्ये झाली, तर आयसीसी एकदिवसीय विश्वकप स्पर्धेची सुरवात १९७५ साली झाली. भारतात इंडियन प्रिमीयर लिगची सुरवात २००८ साली झाली, तेव्हापासून या स्पर्धेची लोकप्रियता पराकोटीला पोचली आहे. १९८० किंवा १९९० च्या दशकांपेक्षा आज क्रिकेट सामना पाहण्याचा अनुभव खूपच आकर्षक आणि रोमहर्षक बनला आहे. आजचे क्रिकेट हे खूप विकसित होत गेलेले आहे, कारण ते उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रानुसार बदलत गेले आहे. खरं, तर क्रिकेट हा खेळच मुळी ''प्रोजेक्टाईल मोशन'' या भौतिकशास्त्राच्या सिद्धांताचा वापर करून खेळला जातो. नेमके विज्ञान जाणणाऱ्या खेळाडूला त्यात प्राविण्य मिळविणे कठीण जात नाही. मात्र ही वैज्ञानिक तत्वे शतांश सेकंदात डोक्यात घुसळावी लागतात. कोणताही खेळाडू ''डेटा इंटेलिजन्स''च्या वापराला नकार देऊ शकत नाही. डेटा इंटेलिजन्स म्हणजे पूर्वीच्या व तात्कालीन परिस्थितीचा लेखाजोगा. खेळत असलेल्या मैदानाची पूर्वीची स्थिती, मैदान नव्याने बांधणी झाले असेल तर त्याची आखणी, वाऱ्याचा वेग, गोलंदाजाच्या उंचीनुसार चेंडूला मिळणारी उसळी, मुख्य खेळपट्टीशिवाय बाहेरच्या मैदानाचा भाग किंवा सीमारेषा कोणत्या दिशेला आखूड-लांब आहे, या सर्वांची गणितीय सुसूत्रता फलंदाजाला चेंडू टोलविण्यापूर्वी लक्षात घ्यावी लागते. क्रिकेट पीच म्हणजे ज्याला ''विकेट'' किंवा ''ट्रॅक'' संबोधले जाते ते कोणत्या प्रकारची माती वा मुरूम वापरून बनविलेली आहे, त्यावरून चेंडूची फिरकी आणि उसळी ठरत असते. खेळपट्टी कोरडी आहे की तिच्यामध्ये थोडा ओलावा शिल्लक आहे, त्यावरून गोलंदाज आणि फलंदाज आपल्या शैलीला मुरड घालून खेळ खेळत राहतो. त्यानुसार सराव मिळावा म्हणून कृत्रिम खेळपट्टी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. गोलंदाजाने हातातून सोडलेला चेंडू खेळपट्टीवर आदळताच त्याचा ताशी वेग किती आहे, हे मोजण्यासाठी स्पिडोमिटरचा वापर होतो. त्यानुसार लगेचच टीव्हीच्या स्क्रिनवर वेग दर्शविला जातो. जर तोच चेंडू फलंदाजाने व्यवस्थित टोलवला असेल तर त्याचाही वेग मोजता येतो. शिवाय उंच उडालेला चेंडू जमिनीपासून किती उंचीवर आहे आणि तो आडव्या रेषेत किती अंतर कापणार आहे; जर तो षटकार असेल तर किती दूर गेला आहे, त्यासाठी व्हॅगन व्हील प्रोजेक्शन तसेच स्पायकॅम किंवा स्पायडर कॅमेरा वापरला जातो.
क्रिकेटमध्ये बऱ्याचदा युडीआरएस घेतला जातो. यात हॉट स्पॉट आणि हॉक आय या दोन प्रमुख तंत्रांनी मैदानावरील पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार केला जातो. फ्रेंच शास्त्रज्ञ निकोलस बिओन याने शोधलेल्या हॉट स्पॉट या तंत्रात इन्फ्रारेड इमेजिंग सिस्टिम आहे. या कॅमेऱ्यांत सतत रेकॉर्डिंग होत असते. हे कॅमेरे चेंडू पॅड, बॅट, जमीन वा ग्लोव्हजला लागल्यानंतर निर्माण होणारी उष्णता मोजतात. सब्स्ट्रॅक्शन सिस्टिमचा उपयोग करून ब्लॅक अँड व्हाइट निगेटिव्ह फ्रेम कॉम्प्युटरवर तयार करण्यात येते. त्यामुळे चेंडू कोणत्या ठिकाणी आदळला, त्याचा योग्य निर्णय घेण्यात येतो. त्याचप्रमाणे स्निकोमीटर ही साऊंड डिटेक्शन बेस्ड सिस्टिम आहे. म्हणजे यात आवाजाच्या आधारे निश्चित करण्यात येते की चेंडू बॅटला लागला की पॅडला. हॉक आय तंत्रज्ञान एक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहे, त्याचा वापर करून चेंडूची पुढील दिशा आणि मार्ग निश्चित करण्यासाठी होतो. लेग बिफोर विकेट म्हणजे एलबीडब्ल्यू शोधण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. स्टम्पमध्ये कॅमेरा व मायक्रोफोन बसवून स्लेजिंग म्हणजेच अनावश्यक बडबड पकडण्याची सोय देखील करण्यात आली आहे. हाच मायक्रोफोन आपल्याजवळ बाळगून एखादा खेळाडू समालोचकांशी चालू सामन्यात संवाद देखील करू शकतो. मात्र या तंत्राचा वापर करून प्रशिक्षकाशी बोलण्यास सक्त बंदी आहे. पंचाच्या डोक्यावर कॅमेरा, हवेत लटकणाऱ्या तारेला कॅमेरा, ३६० अंशात क्षणचित्रे घेता येतील अशा प्रकारे कॅमेरा या विविध पद्धतीने क्रिकेट प्रेक्षकांना ''आपणच मैदानावर आहोत'' अशी सहअनुभूती देत असते. स्कोअर बोर्डचे स्वयंचलित तंत्रज्ञान तर कोणतीही चूक न करता प्रत्येक धावेची आणि चेंडूची नोंद ठेवत असते. शिवाय यात वापरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने नवीन रेकॉर्ड, जुना रेकॉर्ड सहजतेने सर्वांसमोर आणता येतो. मैदानावरील प्रकाश आणि दव मोजण्यासाठी देखील मशीन्स लावलेल्या असतात. तसेच स्पर्शाने प्रकाशमान होणाऱ्या बेल्स मैदानावर वापरल्या जात असल्याने चेंडूचा किंवा हाताचा पुसटसा स्पर्श जरी स्टम्पला झाला तरी लगेचच आपले कर्तव्य चोख बजावतात.
फलंदाजाला ताशी दीडशेपेक्षा अधिक वेगात येणाऱ्या चेंडूचा सराव करण्यासाठी बोलिंग मशीनचे सहाय्य होते. क्षेत्ररक्षकाला झेल पकडण्यासाठी आणि दीर्घ पल्याड चेंडू फेकण्यासाठी थ्रो मशीन वापरले जाते. इतकेच कशाला, जर एखाद्या गोलंदाजाची शैली संशयास्पद असेल तर बोलिंग करताना त्याच्या मनगटाचा कोन किती अंशाचा होतो, हे तपासण्यासाठी देखील तंत्रज्ञानच उपयुक्त ठरते. एवढे सगळे करुन जर चालू सामन्यात पाऊस आला किंवा इतर कोणत्याही अनावश्यक कारणाने सामना अर्धवट थांबवावा लागणार असेल तर हार-जीतचा फैसला करण्यासाठी सर्वात किचकट अशी डकवर्थ लुईस नियमावली सांख्यिकी तज्ञ फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांनी क्रिकेटला दिली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता कोणालाही असे वाटेल की यात खेळ कमी आणि तंत्राविष्कार जास्तीचा आहे. तर याचे एकत्रित उत्तर ''हो'' असेच आहे. तंत्रज्ञान नव्हते तेव्हाही क्रिकेट लोकप्रिय होतेच पण आज ज्या प्रमाणात पैसा या खेळाचे मुलभूत साध्य झाले आहे त्या प्रमाणात विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून खेळ अधिक नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न होत राहील आणि त्यात काहीही गैर नसेल.
(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)