
Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे फुल्ल
रत्नागिरी - कोकणातला गणेशोत्सव म्हटला की मुंबईतील चाकरमान्याला आपल्या गावी जायचे वेध लागतात. यंदाची गणेशचतुर्थी १९ सप्टेंबरला असून १६ मे पासून कोकण रेल्वेच्या आरक्षणाला सुरवात करण्यात आली. आरक्षण सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आरक्षण फुल्ल झालं आहे. १२० दिवस आधीच आरक्षण फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
अवघ्या पाच मिनिटात बुकिंग फुल्ल झाल्याने प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. काही प्रवासी प्रतीक्षा यादीत तिकीट काढत आहेत, परंतु प्रतीक्षा यादीही ३०० ते ४०० च्या घरात पोहोचली आहे. काही गाड्यांची प्रतीक्षा यादीच संपली आहे. कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेस दुसऱ्याच दिवशी हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी दरवर्षी खासगी वाहने, एसटी, खासगी बसेसप्रमाणेच मेल एक्स्प्रेस गाड्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते. त्यातच रेल्वे प्रवासास सर्वाधिक पसंती दिली जाते. दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्या प्रत्येक वर्षी भरून जातात. मात्र सामान्यांच्या खिशाला परवडणारी ही कोकण रेल्वे चार महिने आधीच फुल्ल झाली आहे.