
आजगावात रंगला ‘कवितेचा तास’
04265
आजगाव ः ‘कवितेचा तास’ उपक्रमात सहभागी मुलांसह मान्यवर.
आजगावात रंगला ‘कवितेचा तास’
‘साहित्य कट्टा’चा उपक्रम; कविता वाचन, सादरीकरणाने रंगत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा मासिक एकतिसावा कार्यक्रम ‘कवितेचा तास’ या कार्यक्रमाने रंगतदार झाला. आजगाव वाचनालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात चार मुलांनी पाठ्यपुस्तकातील कविता सादर केल्या, तर ज्येष्ठांनी स्वरचित कविता सादर केल्या.
सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. मुलांनी प्रार्थना म्हटली व नंतर आपल्या मराठीच्या पुस्तकातील कविता सादर केल्या. आर्यन पांचाळ याने ‘माय’, मानसी पांचाळ हिने ‘वल्हवा रं’, विष्णू कळसुलकर याने ‘माय मराठी’, तर शुभम सावळ याने ‘गर्जा महाराष्ट्र माझा’, या कविता सादर केल्या. दिया सावंत व साक्षी सुतार यांनी प्रार्थनेत सहभाग घेतला. त्यानंतर स्वरचित कवितेच्या सादरीकरणात स्नेहा नारींगणेकर यांनी ‘संयम’, ‘कृष्णवेणी’सह तीन कविता सादर केल्या. सोमा गावडे यांनी ‘कळीत लपलेले फूल’, ‘मानवाचे खरे रूप’ व ‘अपघाती वळण’ या कविता सादर केल्या. विनय फाटक यांनी ‘अर्थ अस्तित्वाचा’ ही सुरेख कविता सादर केली. विशाल उगवेकर यांनी ‘निसर्ग’ व ‘आई’ या कविता सादर केल्या, तर विनय सौदागर यांनी ‘वारी अनुभवावी’, ‘लगीनसराय’ आणि ‘शाळेतले दिस’ या कविता सादर केल्या. एकनाथ शेटकर यांनी सादर केलेल्या संजीवनी मराठे यांच्या ‘देवा’ या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विनायक उमर्ये, मुग्धा सौदागर, अनिता सौदागर, प्राची बेहेरे, प्रिया आजगावकर, सरोज रेडकर, अनिता पांचाळ आणि शहानूर शेख आदी काव्यप्रेमी उपस्थित होते. मुलांचा सहभाग लक्षणीय होता. सिंधू दीक्षित यांच्यावतीने उपस्थित सर्वांना अल्पोपाहार देण्यात आला.