
‘शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष’ साजरे करणार
04276
सिंधुदुर्गनगरी : पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडियर सुधीर सावंत. शेजारी सचिव रावराणे, प्रा. विलास सावंत, प्रा. विवेक राणे आदी.
‘शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष’ साजरे करणार
ब्रिगेडियर सुधीर सावंत; चार जूनपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती देशातच नव्हे तर जगभर पसरली आहे. ते शेतकऱ्यांचे कैवारी होते. वनांच्या संवर्धनाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. येत्या ६ जूनला ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे २०२३-२४ हे ‘शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले असून ४ जूनला याचा प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सावंत बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान सचिव शांताराम रावराणे, राजू रावराणे, प्रा. विलास सावंत, प्रा. विवेक राणे आदी उपस्थित होते. ब्रिगेडियर सावंत म्हणाले, ‘‘३५० वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त यावर्षी २५००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील विविध शासकीय, अशासकीय व खासगी संस्थांच्या सहकार्यातून या वर्षी क्रांतिकारी वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै या कृषीदिनी या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासन, शाळा, महाविद्यालये, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सैनिक फेडरेशन, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, ग्रामीण कृषी कार्यानुभवचे विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यंदाचे हे वर्ष ‘युनो’मार्फत आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. कृषी विज्ञान केंद्र, किर्लोसच्या माध्यमातून यावर्षाच्या पावसाळी व हिवाळी हंगामात ५० हेक्टर क्षेत्रावर भरडधान्य अभियान राबवियात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्राद्वारे यावर्षी नाचणी, वरी, सावा अशा विविध भरडधान्य पिकांच्या बियाण्यांची उपलब्धता शेतकऱ्यांना करून देण्यात येणार असून लागवड तंत्रज्ञान, बियाणे संवर्धन व प्रक्रिया याविषयी तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे. विशेष करून पांढऱ्या नाचणीचा व वरी पिकाचा प्रसार करण्यात येणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘यावर्षी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जगभर साजरे केले जात आहे. ५० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड हाती घेतली आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच केंद्राच्या प्रक्षेत्रावर भाताच्या विविध सुधारीत जातीची लागवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करून नैसर्गिक लागवड पद्धतीचा अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यात येणार आहे. तांत्रिक मार्गदर्शन किर्लोस केंद्राद्वारे करण्यात येणार आहे. मानवाचे आरोग्य सुखी व संपन्न होण्यासाठी मी समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाची स्थापना केली आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे हा प्रकल्प राबविला जात आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भरडधान्य मिशन, तृणधान्य मिशन, वृक्ष लागवड मिशन, नैसर्गिक शेती मिशन राबविण्यात येत आहे.’’
................
चौकट
जागतिक नैसर्गिक शेती अभियान
किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीची चळवळ सात वर्षांपासून देशभर सुरू केली. या मोहिमेला केंद्राने मंजुरी दिली असून त्यासाठी खास प्रयत्न केले. भविष्यात ही नैसर्गिक शेतीची मोहीम जागतिक होणार आहे. दर्जेदार अन्न निर्मितीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी तसेच शेतीतील होणारा भरमसाठ खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती हा एक उत्तम पर्याय आहे, असे यावेळी ब्रिगेडियर सावंत म्हणाले.