
देवगड खाडी रस्त्याची चाळण
04275
देवगड ः येथील खाडीकिनारच्या रस्त्याची माठी दुरवस्था झाली आहे. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
देवगड खाडी रस्त्याची चाळण
वाहनचालक त्रस्त; पावसाळ्यापूर्वी डागडुजी आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः येथील खाडीकिनारच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून सतत वाहतूक होत असल्याने रस्ता दुरवस्थेचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. आता पावसाळ्यात रस्त्याची आणखीनच दुरवस्था होणार असल्याने चिखल आणि खड्ड्यातूनच मार्ग काढीत जावे लागण्याची शक्यता आहे.
येथील खाडीकिनारी मासळी उलाढालीच्या निमित्ताने वाहनांची मोठी वर्दळ असते. मासळी तसेच बर्फ वाहतूक करणारी वाहने सतत धावत असतात. याशिवाय अन्य वाहनांचीही वर्दळ असते. या भागात वस्ती असल्याने नागरिकांचीही खासगी वाहने असतात. त्यातच पर्यटकांच्या वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावरून सतत वाहने धावत असतात; मात्र, सद्यस्थितीत खाडीकिनारच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याची चाळण झाली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्याने त्यातूनच मार्ग काढीत वाहन चालक वाहने हाकीत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता काही ठिकाणी खचला आहे. बाजूपट्टीही सुरक्षित राहिलेली नाही.
---
संभाव्य त्रास टाळणे आवश्यक
पावसाळा तोंडावर आला आहे. अशा अवस्थेत रस्त्याची आणखीनच दुरवस्था होणार आहे. धुळीमुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरण्याची भीती आहे. त्यातून वाहने हाकणे कठीण होऊन बसणार आहे. आता मासळी हंगाम अंतिम टप्यात असला तरीही पावसाळ्यातही नौकांच्या डागडुजीच्या निमित्ताने वाहने धावत असतात. त्यामुळे संभाव्य त्रास टाळण्यासाठी रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.