सिंधुदुर्ग प्रगती अहवाल सादर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग प्रगती अहवाल सादर करा
सिंधुदुर्ग प्रगती अहवाल सादर करा

सिंधुदुर्ग प्रगती अहवाल सादर करा

sakal_logo
By

04284
सिंधुदुर्गनगरी ः विकास आराखडा बैठकीत आढावा घेताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. शेजारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व अन्य.

सिंधुदुर्ग प्रगती अहवाल सादर करा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी; विकास आराखडा आढावा बैठकीत सूचना

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः जिल्‍ह्याला प्रगती पथावर नेण्‍यासाठी तुमचे अनुभव, नागरिकांच्या अपेक्षा यांचा समावेश करण्‍याबाबत सर्व विभागांनी गांभीर्यतेने अभ्‍यास करून नियोजन अहवाल द्यावा. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्‍हाण यांनीही सूचना दिल्‍या असून पुढील बैठक त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणार आहे. सर्व विभागांनी दहा दिवसांत अहवाल द्यावा, अशी सूचना जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्‍हा विकास आराखडा आढावा बैठक आज झाली. या बैठकीला मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्रीपाद पाटील, मत्‍स्यविभागाचे सहायक आयुक्‍त प्रदीप सुर्वे आदी उपस्थित होते.
जिल्‍हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरण करून सविस्‍तर माहिती दिली. नियोजन विभागाने २० एप्रिलला निर्गमित केलेल्‍या शासन निर्णयानुसार जिल्‍हा विकास आराखडा तयार करण्‍यासाठी विविध स्‍तरांवर समित्‍यांचे गठण करणे तसेच मार्गदर्शन सूचनांचा यात समावेश होता. स्‍वातंत्र्यांच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍त भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था २०२५-२६ पर्यंत पैच ट्रिलीयन डॉलर करणे, भारताच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे. राज्याची अर्थव्यवस्था एकूण तीन टप्प्यांत ३.५ ट्रिलीयन डॉलर करण्याचा संकल्प आहे, अशी पार्श्वभूमीही यावेळी सांगितली. ठळक वैशिष्ट्ये, नियोजन, समाविष्ट बाबी टप्पा-१ टप्पा-२ आणि ३ बाबतही मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘सर्व विभाग प्रमुखांनी जिल्ह्यातील आपल्या अनुभवाच्या अनुषंगाने जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी आवश्यक मुद्यांचा समावेश करावा. त्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे अभिप्रायही घ्यावेत. सर्व माहिती अद्ययावत करावी. जिल्हा नियोजन, १५ वा वित्त आयोग, अन्य विकास योजनांमधून एकत्रित नियोजन करावे. कृषी पर्यटन, जिल्हा उद्योग केंद्र यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. पर्यटनस्थळे, किल्ले, समुद्र किनाऱ्यांकडे जाणारे रस्ते तसेच मोपा विमानतळावरून जिल्ह्यात येणारे रस्ते व्यवस्थित हवेत, यावरही भर द्यावा.’’
.................
चौकट
‘अभ्यासपूर्वक अहवाल द्या’
यासाठी अभ्यासपूर्वक उद्दिष्ट निर्धारित करून नियोजन करा. नागरिकांच्या काही अपेक्षा, कल्पना असतील तर त्यांचाही समावेश करून दहा दिवसांत अहवाल सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून मुद्यांवर आधारित, त्याशिवायही काही चांगल्या कल्पना असतील, तर त्यांचाही समावेश अहवालात करावा, असे सांगितले.