
एसटी अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
एसटी अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
रत्नागिरीः शहराजवळील शिळ-मजगाव फाटा येथे शहरी एसटी बस जात असताना झाडाची फांदी लागून ती तुटून रस्त्यावर काम करणाऱ्या साक्षीदाराच्या अंगावर पडली. त्यात ते जखमी झाले. निष्काळजीपणे एसटी चालविल्या प्रकरणी शहर पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनायक आत्माराम पवार (वय ४८, पुष्पदत्त अपार्टमेंट, नाचणे गोडावून स्टॉप रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १९) सकाळी पावणेबाराच्या सुमारास करबुडे फाटा ते रत्नागिरी जाणाऱ्या मार्गावर शिळ-मजगाव फाटा येथील उतारावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित पवार हे शहरी वाहतुकीची बस ही आंबेकोंड ते रत्नागिरी असे जात असताना शिळ-मजगाव उतारावर आल्यावर झाडाची फांदी रस्त्यावर आली होती. ही फांदी तुटून तेथे काम करणारे विकास शंकर भाटकर (वय ३८, रा. मिरजोळे-भाटकरवाडी, रत्नागिरी) यांच्या डोक्याला लागून किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे करत आहेत.
-------
भाट्ये येथे हातभट्टी विक्रीवर कारवाई
रत्नागिरीः शहरानजीकच्या भाट्ये-खोतवाडी येथे अवैद्य गावठी हातभट्टीच्या दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये २५० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली असून शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे. अशोक बाळकृष्ण पोतदार (वय ६५, रा. भाट्ये-खोतवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २०) रात्री नऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पेट्रोलिंग करत असताना संशयिताकडे हातभट्टीची पाच लिटर दारु सापडली. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
-------
कारवांचीवाडीतील वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरीः शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील वृद्धाने विषारी द्रव्य पिल्याने तोंडातून फेस येत होता. तत्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. धाकू विठ्ठल जांगळे (वय ७०, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता २२) सकाळी दहाच्या सुमारास घडली. सकाळी जांगळे यांच्या तोंडातून फेस येत असल्याने पत्नी सुनीता यांनी तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
----------
चिपळुणात घरफोडी, ४६ हजार लंपास
चिपळूण : चिपळूण-धामणंद मार्गावरील कळबंस्ते पेठ येथील मातोश्री अपार्टमेंटमधील सदनिका फोडून सुमारे ४६ हजाराची रोकड चोरट्याने पळविली. ही घटना रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्याविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कळंबस्ते पेठ येथील मातोश्री अपार्टमेंटमध्ये रहिवासी राजू परशुराम जाधव व प्रितेश प्रभाकर कदम हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच शेजारी प्रमोद कदम यांनी त्यांना कळवले. माहिती मिळताच लातूर येथे कामानिमित्ताने गेलेले राजू जाधव हे तत्काळ घरी आहे. यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसून आले. तसेच कपाट उघडून त्यातील रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले. एका कपाटातून ५ हजार ५०० तर त्यांच्या आईच्या बेडरूममधील लाकडी गल्ल्यातून ४० हजार रुपये, असे एकूण ४५ हजार ५०० रुपयांची रोकड चोरीला गेली होती. प्रितेश कदम यांच्या घरी देखील चोरी झाली असून तेथूनही काही साहित्य चोरीला गेले आहे. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---------
कृषी पर्यवेक्षकाचा अपघाती मृत्यू
चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावरील कळवंडे फाटा येथे मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हेमंत सदाशिव परचुरे (५३, दोनवली, कीर्तनवाडी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना १० मे सकाळी नऊ वाजता कळवंडे फाटा येथे घडली होती. मार्गताम्हाणे येथील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण ज्ञानू शिंदे (वय ४८, आंधळगाव, मंगळवेढा, सोलापूर) हे मार्गताम्हाणे येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी ते मार्गताम्हाणे परिसरात निघाले होते. कळवंडे फाटा येथे त्यांच्या दुचाकीला मोटारीची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.