
सावंतवाडी वनविभागातर्फे मळगाव घाटीची स्वच्छता
04331
मळगाव : स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या वनविभाग कर्मचाऱ्यांसह अन्य.
सावंतवाडी वनविभागातर्फे
मळगाव घाटीची स्वच्छता
सावंतवाडी, ता. २२ ः जागतिक पर्यावरण दिन ५ जूनला साजरा होत असून याचे औचित्य साधून सावंतवाडी वनपरिक्षेत्र कर्मचारी व माजगाव, मळगाव ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मळगाव घाटीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये घाटीत रस्तादुतर्फा साचलेल्या कचऱ्याचे संकलन करून तो नगरपालिकेच्या प्रक्रिया केंद्रात पोचविण्यात आला.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘लाईफ’ (LiFE-Lifestyle For Environment) या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. यामध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी आपल्या जीवनशैलीत ७५ प्रकारचे विविध पर्यावरणपूरक बदल अंगिकारणे, हे समाविष्ट केले आहे. जसे की सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबविणे, जवळच्या अंतरावरील प्रवासासाठी सायकलच्या वापराला प्रोत्साहन देणे, विजेचा वापर काटकसरीने करणे, परिसर स्वच्छता आदी विविध बदलांचा समावेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर मळगाव घाटीत राबविलेल्या स्वच्छता कार्यक्रमामध्ये सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांच्यासह सर्व सावंतवाडी वनपरिक्षेत्र कर्मचारी, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, अजय सावंत, सचिन मोरजकर आदींनी सहभाग घेतला. मळगाव घाटीत कचरा टाकून दुर्गंधीसह पर्यावरण व वन्यजीवांना बाधा पोहोचवू नका, असे आवाहन वनविभाग व माजगाव, मळगाव ग्रामपंचायतीनी केले आहे.