केसरकरांकडून बाजाराबाबत राजकारण नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांकडून बाजाराबाबत राजकारण नाही
केसरकरांकडून बाजाराबाबत राजकारण नाही

केसरकरांकडून बाजाराबाबत राजकारण नाही

sakal_logo
By

04333
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे. बाजूला अशोक दळवी, बबन राणे, बाबू कुडतरकर आदी.

टिचभर कामे अन् करोडोंच्या बाता

पोकळेंचा परब यांच्यावर निशाणा; केसरकरांचे बाजारप्रश्नी राजकारण नाही

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी आठवडा बाजारावर कधीच राजकारण केले नाही. तलावाकाठील बाजारामुळे शहराचे स्वरूपच बदलले होते, म्हणूनच हॉकर्स संघटनेने मान्य केलेल्या जागेतच आठवडा बाजार हलविण्यात आला आहे. त्यामुळे बाजाराचा राजकारण कोण करतं, हे सर्वांना ज्ञात आहे, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर केली.
मंत्री केसरकर यांनी मतदार संघात करोडोंची कामे आणली; पण, त्याची कधी जाहिरात केली नाही. उलटपक्षी टिचभर कामे आणून कोट्यवधीच्या बाता या ठिकाणी मारल्या जात आहेत. त्यामुळे केसरकरांनी शहराचं वाटोळं केले, हे परब यांचे म्हणणे चुकीचे असून त्यांचे हे वाक्य सावंतवाडीच्या संस्कृतीला अशोभनीय असल्याचेही श्री. पोकळे म्हणाले.
श्री. पोकळे यांनी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन दिवसापूर्वी आठवडा बाजारावरून माजी नगराध्यक्ष परब यांनी केसरकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. त्यांच्यासोबत यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, नंदू शिरोडकर उपस्थित होते.
श्री. पोकळे म्हणाले, ‘‘शासकीय गोदामाच्या परिसरात हलविलेला आठवडा बाजार हा कुठल्याही हट्टापायी मंत्री केसरकर यांनी हलविलेला नाही. या बाजारामागे कुठल्याही प्रकारचे राजकारण नसून केवळ शहराचे सौंदर्य तलावाकाठील बाजारामुळे बाधित होत होते. एकूणच शहराचे स्वरूप बदलले होते. याशिवाय ज्येष्ठ नागरिककांकडून वेळोवेळी केसरकर यांना फोन जात होते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय हॉकर्स संघटनेला पूर्णपणे विश्वासात घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करत आणि हॉकर्स संघटनेने ही जागा मान्य केल्याने हा बाजार नवीन जागेत भरवला आहे. मुळात तब्बल दोन महिने बाजार हलविण्याबाबत मंत्री केसरकर यांच्या सूचना होत्या. त्यामुळे शहरातील विविध जागांचा विचार करता गोडाऊन परिसरातील जागा निश्चित करण्यात आली. माजी नगराध्यक्ष परब यांनी बाजारावरून मंत्री केसरकरांवर केलेली टीका ही बिनबुडाची असून त्यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न येत्या काही दिवसात सोडविण्यात येणार आहेत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘मुळात शालेय विद्यार्थ्यांचा विचार करता या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध आहेत. तलावाकाठी बाजार भरताना त्या ठिकाणी सुद्धा मोठे हायस्कूल होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित झाला नाही. पार्किंगच्या बाबतीत आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. शौचालयासाठी गार्डनमध्ये सोय उपलब्ध आहे. केसरकर यांनी कधीच आठवडा बाजाराबाबत राजकारण केले नाही, जे कोण राजकारण करत आहेत हे सावंतवाडीतील जनता चांगलीच ओळखून आहे.’’
श्री. पोकळे म्हणाले, ‘‘झिरंगवाडीतील रस्त्या संदर्भात त्यांनी केलेली टीका आणि फोटो लावण्यासंदर्भात केलेले वक्तव्य हे सावंतवाडी शहराच्या संस्कृतीला अशोभनीय असेच आहे. मुळात झिरंगवाडी येथे तब्बल आठ कोटींची कामे मंजूर आहेत. सावंतवाडी शहराला गेल्या तीन वर्षात मंत्री केसरकर यांनी तब्बल २५ कोटीचा निधी दिला. संपूर्ण मतदारसंघातही कोट्यावधीची कामे त्यांनी मंजूर करून आणली आहेत. त्यामुळे मतदार संघाचे वाटोळं केले हे परब यांचे म्हणणे चुकीचे आहे.’’
----------
चौकट
‘त्या’ वृक्षांबाबत परबांनी तज्ज्ञांशी बोलावे
आठवडा बाजाराच्या नव्या जागेतील त्या वृक्षांच्या फांद्यांचा विचार करता हे वृक्ष ''रेन ट्री'' जातीचे आहेत. त्याच्या फांद्या सहसा मोडून पडत नाहीत. फांद्या सुकल्यानंतरच त्या मोडून पडतात. या संदर्भात तज्ञ व्यक्तींकडून परब यांनी माहिती करून घ्यावी. व्यापाऱ्यांची भीती लक्षात घेता संबंधित प्रशासनाशी चर्चा करू. काही फांद्या पावसाळ्याआधी तोडून घेतल्या जातील, असेही श्री. पोकळे यांनी यावेळी सांगितले.
-----------
चौकट
सेल्फी पॉईंटची जागा चुकीची
शहरात सेल्फी पॉईंटसाठी जागा उपलब्ध असताना तलावाकाठी स्लॅबवर सेल्फी पॉईंटसाठी जागा निश्चिती चुकीचे आहे. यामुळे मोती तलावाचे सौंदर्य बाधित होत आहे. शहरात अन्य कुठेही हा सेल्फी पॉईंट उभारला जाऊ शकतो. चुकीच्या जागेमुळे हे काम थांबल्याचे उत्तर पोकळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिले.