
गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारे रॅकेट
गोवा बनावटीच्या दारूची
तस्करी करणारे रॅकेट
गोवा भिवंडी मार्गे राजस्थानला ; दारू पकडूनही आरोपी मोकाट
खेड, ता. २२ : गोवा बनावटीच्या दारूची महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी भिवंडी मार्गे तस्करी केली जात असल्याची माहिती उघड झाली. यामागे दारू तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असून गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पकडलेल्या गोवा बनावटीच्या करोडो रुपयांच्या दारूच्या तस्करीतील मुख्य आरोपीपर्यंत उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचे हात पोहोचत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात सर्वात जास्त महसूल हा उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून गोळा होत असतो यासाठी महाराष्ट्रातील विक्री होणाऱ्या मद्यावर महाराष्ट्र शासनाचा कर असतो परंतु गेल्या काही दिवसांपासून गोवा बनावटीच्या दारूने महाराष्ट्रात शिरकाव केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सिंधुदुर्ग येथे उत्पादन शुल्क विभागाने सलग तीन वेळा कारवाई करत लाखो रुपयांची गोवा बनावटीची दारू पकडली असताना रत्नागिरी विभागातील खेड येथे तपासणी दरम्यान एका सीलबंद टेम्पो मध्ये ५०० बॉक्स गोवा बनावटीची आणि महाग दारूची गाडी पकडण्यात आली. या गाडीची तपासणी करताना गाडीवरील चालकाला बदली सांगून गाडीवर पाठवण्यात आले पण सीलबंद असणाऱ्या टेम्पोत दारू असल्याची कल्पनाही त्या चालकाला दिली नाही, याउलट त्याच्या हातात कलरचे डब्बे असल्याचे गोवा येथील कंपनीचे बिल देण्यात आले होते. सीलबंद गाडीतून कलरच्या डब्याच्या नावाखाली दारूची तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर येथील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी भिवंडी वारी केली, त्याठिकाणी देण्यात आलेला पत्ताही बोगस असल्याचे समोर आल्यानंतर ताब्यात असलेल्या गाडीच्या माहितीच्या आधारे मालकापर्यंत पोहोचण्याऐवजी उत्पादन शुल्क विभागाचा तपास अचानक थंड झाल्याचे पहावयास मिळत आहे. गोवा बनावटीच्या मद्याची किंमत असल्याने या दारूला प्रचंड मागणी असल्याचे बोलले जात आहे. परंतु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी विभागात पकडण्यात आलेल्या करोडोच्या दारूमुळे महाराष्ट्रातील उत्पन्नावर परिणाम होत आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या मद्य विक्रीमध्ये गोवा बनावटीच्या दारू तस्करीच्या शिरकावाचे मोठे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर असून लवकरच गोवा भिवंडी मधील दारू तस्करांचे बिंग फोडून मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आता उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर पडले आहे.
------------
चौकट
तपासणी सुरू
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर ढोमकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगत तपासणी मोहीम सुरू असल्याचे सांगितले.