अनधिकृत बांधाकामांविरोधात ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधाकामांविरोधात ठिय्या
अनधिकृत बांधाकामांविरोधात ठिय्या

अनधिकृत बांधाकामांविरोधात ठिय्या

sakal_logo
By

04365
सासोली ः उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, एकनाथ नाडकर्णी आदी. (छायाचित्र ः संदेश देसाई)


अनधिकृत बांधाकामांविरोधात ठिय्या

सासोलीतील जमिन वाद प्रकरण; ग्रामपंचायतीसमोर उपोषण

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २२ ः सासोलीतील सामायिक जमिनीतील बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दोडामार्ग तहसीलदार यांनी येथील ग्रामपंचायतीला दिले होते; मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
सासोली येथील संबंधित सर्व्हे नंबरात मिळकतींचे सामायिक भागदार हे कब्जेदार, वहिवाटदार असून या मिळकतीतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये जमीन मालक व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. संबंधित सामायिक जमिनीचे अद्याप धडेवाटप झालेले नाही, असे असताना काहींनी या जमिनीतील काही अविभाज्य हिस्सा खरेदी केला असून याबाबत ग्रामस्थांची कोणतीही संमती घेतली नाही. संबंधितांना विशिष्ट क्षेत्रावर आपला मालकी हक्क कब्जाभोग्य किंवा वहिवाट सांगण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का वापरून बनावट दाखल्याबाबतचा अर्ज ग्रामपंचायतीने पोलिसांकडे दिला होता. या अर्जासंदर्भात योग्य ती पूर्तता करण्याचे पोलिसांनी ग्रामपंचायतीला कळविले; मात्र यावरही ग्रामपंचायतीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. सामायिक जमिनीचे धडे वाटप झालेले नसताना संबंधितांनी गुंडगिरीच्या जोरावर केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊनही ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही न केल्याने या विरोधात ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे येथील गटविकास अधिकारी यांना दिला होता. या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी आज सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी एकनाथ नाडकर्णी व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
............
चौकट
ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचे आरोप
संबंधितांनी ‘त्या’ जमिनीत केलेली अनधिकृत बांधकामे तसेच तेथे लावलेले फलक काढून टाकण्याचे आदेश दोडामार्ग तहसीलदार यांनी ११ एप्रिलला सासोली ग्रामपंचायतीला दिले होते; मात्र ग्रामपंचायतीने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. परिणामी संबंधित सामायिक जमिनीतील अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत चालली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन यात सामील असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
--
...अन्यथा आम्ही काय ते करू
उपोषणकर्त्यांनी कैफियत मांडल्यानंतर राजन तेली यांनी गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. तुम्ही एकमेकांवर जबाबदारी ढकलून चालढकलपणा करत आहात. नुसता पत्रव्यवहार न तातडीने कारवाई करा, असे गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले. तर बाहेरचे लोक दादागिरी करू लागले तर लोक गप्प राहणार का? चार दिवसांत कारवाई करा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला.