पान एक-वैभववाडीत रेल्वेप्रवाशाला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-वैभववाडीत रेल्वेप्रवाशाला गंडा
पान एक-वैभववाडीत रेल्वेप्रवाशाला गंडा

पान एक-वैभववाडीत रेल्वेप्रवाशाला गंडा

sakal_logo
By

वैभववाडीत रेल्वेप्रवाशाला गंडा

सव्वा लाखाचे दागिने लांबवले; दिवा पॅसेंजरमधील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २२ ः रेल्वेत चढत असताना भोम येथील महिला प्रवासी दिव्या दिनेश कदमच्या पर्समधील सव्वालाख रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. हा प्रकार बुधवारी (ता.१८) वैभववाडी रेल्वेस्थानकात झाला. यासंदर्भात आज पोलिसांत तक्रार झाली आहे.
भोम येथील दिनेश मोतिराम कदम हे दिवा येथे राहतात. ते आणि त्यांची पत्नी, दोन लहान मुले ३ मे रोजी गावी आली होती. १८ रोजी ते पुन्हा मुंबईला निघाले होते. सावंतवाडी-दिवा पँसेजर ही गाडी वैभववाडी रेल्वे स्थानकात साधारण पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आली. त्यामध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन दिव्या कदम यांच्या पर्समधील अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची अंगठी अज्ञात चोरट्याने लांबवली. गाडीत चढल्यानंतर पर्समध्ये असलेले दुसरे पाकिट दिव्या यांना दिसले नाही. त्यावेळी त्यांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले; परंतु त्यावेळी गाडी पुढच्या स्थानकात गेली होती. मुंबईला पोहोचल्यानंतर ते पुन्हा गावी आले. त्यानंतर त्यांनी आज चोरीची तक्रार वैभववाडी पोलिसांत दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करीत आहेत.
--------------
चौकट
त्याच दिवशी रत्नागिरीतही चोरी
ज्यादिवशी वैभववाडी रेल्वेस्थानकात चोरी झाली, त्याच दिवशी दिवा गाडीतून प्रवास करणाऱ्या आणखी एका महिला प्रवाशाच्या दागिन्यांची रत्नागिरी रेल्वेस्थानकात चोरी झाली. त्यामुळे तो चोरटा त्याच गाडीतून प्रवास करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
-----------
चौकट
चोऱ्यांचा हंगाम
कोकण रेल्वेमार्गावर सराईत चोरटे सक्रिय झाले आहेत. यापूर्वी अनेकदा पोलिसांनी रेल्वेत चोरी करणाऱ्या केरळ, कर्नाटकसह विविध राज्यांतील सराईत चोरट्यांना अटक केलेली आहे. परंतु, हे चोरटे गर्दीच्या हंगामाच्या शोधात असतात. गणेशोत्सव, मे महिन्याच्या सुटीत ये-जा करणारे चाकरमानी, शिमगोत्सव, दसरा या काळात रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यावेळी चोरटे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करतात. विशेषतः पहाटे झोपेत असलेल्या प्रवाशांची बॅग पहाटेवेळी पळविणे, गळ्यातील दागिने खेचून पळून जाणे असे प्रकार या कालावधीत होत असतात.
--------
चौकट
सीसीटीव्हींची गरज
रेल्वे स्थानकामध्ये सीसीटीव्ही आहेत, परंतु रेल्वे प्लॅटफॉर्मवर काही ठराविकच कॅमेरे बसविलेले आहेत. त्यामुळे चोरी किंवा अन्य प्रकार तितकेसे या कॅमेरांमध्ये कैद होत नाहीत. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे.