
चोरीस गेलेला दहा चाकी डंम्पर हस्तगत
rat२२p२७.jpg
४३५८
निवळीः येथे डंपर चोरी प्रकरणात पकडलेल्या चोरट्यासह कारवाई करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे अमंलदार.
चोरीस गेलेला डंम्पर हस्तगत
कर्नाटक येथे कारवाई; ग्रामीण पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
रत्नागिरी, ता. २२ः शहराजवळील निवळी -इसार पेट्रोलपंप येथून चोरून नेलेला डंपर कर्नाटक येथून जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका संशयीताला अटक केली आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने केली.
डंपर चोरीची ही घटना १४ ते १५ मे या कालावधीत निवळीतील इसार पेट्रोलपंपाजवळ घडली होती. ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे समांतर तपास करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिल्या होत्या. तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हयातील संशयित लक्ष्मण उर्फ बाळू नामदेव चवरे (वय २२, रा. चवरे वस्ती पेनुर, ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर ) याला सोमवारी (ता. २२) ला गाणगापूर (ता. अफजलपूर, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक) येथून अटक केली. त्याच्या ताब्यातील चोरीला गेलेला डंम्पर, गुन्हा करण्याकामी वापरण्यात आलेली मोटार व इतर साहीत्य असा एकूण २८ लाख ६३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयिताकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा करण्यासाठी गणेश अरुण पाटील, समाधान शिवाजी चवरे (दोन्ही रा. पेनुर ता. मोहळ, जि.सोलापूर ) हे संशयित सोबत असल्याची माहीती दिलेली आहे. संशयितास पुढील कार्यवाहीकरिता ग्रामीण पोलिसात हजर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी तपास पथकामधील सहायक पोलिस फौजदार संजय कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेल शांताराम झोरे, विजय आंबेकर, योगेश नार्वेकर व पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली आहे.