
बांबूपासून अगरबत्ती उद्योगातून महिलांना रोजगार
04391
तरंदळे : येथील बांबूपासून अगरबत्ती उद्योगाच्या प्रारंभ कार्यक्रमात बोलताना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, बाजूला इतर.
बांबूपासून अगरबत्ती उद्योगातून महिलांना रोजगार
कुलगुरू डॉ. सावंत; जिल्ह्यातील सर्वांत मोठा तरंदळेत प्रकल्प
कणकवली, ता.२३ : बांबूपासून अगरबत्ती तयार करण्याचा सिंधुदुर्गातील सर्वांत मोठा प्रकल्प तरंदळे गावात सुरू होत आहे. या प्रकल्पातून महिलांना मोठी रोजगार संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले.
तरंदळे (ता.कणकवली) येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बांबू पासून अगरबत्ती निर्मितीचा सिंधुदुर्गातील सर्वात मोठा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा प्रारंभ कुलगुरू डॉ.सावंत यांनी केला. यावेळी डॉ. इंदू सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. प्रमोद सावंत, मुळदेचे डॉ. प्रदीप हळदवणेकर, डॉ. परेश पोटफोडे, फोंडाघाटचे डॉ. वी. एन. शेट्ये, सहयोगी प्राध्यापक अजय.डी. राणे, संदीप राणे, योगेश परुळेकर, हेमंत सावंत, पंकज दळी, अमोल गवस आदी उपस्थित होते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये वनशास्त्र महाविद्यालयात दोन वर्षांपासून स्थानिक बांबू प्रजातीचे अगरबत्ती निर्मितीसाठीचे संशोधन केले आहे. या संशोधनाचाच एक भाग म्हणून तरंदळे येथे अगरबत्ती निर्मिती प्रकल्प उभारला आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी अनंत सावंत, डॉ. सत्यवान राणे, राजाराम सावंत, संदेश सावंत, संतोष राणे, प्रभाकर सावंत, संजना राणे आदी उपस्थित होते. डॉ. मनीष कस्तुरे यांनी आभार मानले.
--
स्वतःचा ब्रँड तयार करा
डॉ.सावंत म्हणाले, ‘‘इथल्या प्रकल्पात ‘अनुसया’ अगरबत्तीचा स्वतःचा ब्रँड तयार करा. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत कोकण कृषी विद्यापीठ करेल. तरंदळे सारख्या छोट्या गावात उद्योग निर्मिती व्हावी व गाव उद्योगशील व्हावा. प्रत्येक ठिकाणी रोजगाराचे दालन उघडले जावे यासाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत आहे. अगरबत्ती निर्मितीसाठी लागणारे सर्व प्रशिक्षण या गटाला दापोली कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत दिले आहे. ब्रॅण्डिंग व मार्केटिंगसाठी स्वतःची इमारत तयार केली आहे.’’