
‘लालपरी’चे स्टेरींग आता आदिवासी तरुणांच्या हाती
‘लालपरी’चे स्टेरींग आता
आदिवासी तरुणांच्या हाती
जिल्ह्यात २८ कर्मचारी सेवेत हजर
कणकवली,ता. २३ ः गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातील २८ तरुणांना एसटीचे चालक कम वाहक हे प्रशिक्षण देण्यात आले होते. सिंधुदुर्ग विभागासाठी अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर या २८ चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. आज एसटी विभागीय कार्यालयात हजर राहून ते उद्यापासून (ता.२४) सेवेत रुजू होणार आहेत.
केंद्र शासनातर्फे देशभरामध्ये आदिवासी समाजातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी कौटुंबिक लाभाच्या योजना न्यूक्लिअस बजेट अंतर्गत राबविल्या जातात. यामुळे एसटी महामंडळामध्ये आदिवासी समाजातील युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने वाहक कम चालक असे मोटार वाहकाचे प्रशिक्षण देण्यात येते. गडचिरोली जिल्ह्यासाठी देवास येथे हे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये ज्या आदिवासी समाजातील युवकांनी चालक कम वाहक पदासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले. अशांना राज्यातील वेगवेगळ्या एसटी आगारामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत गडचिरोलीतील २८ तरुणांनी आज सिंधुदुर्ग विभागामध्ये हजेरी लावली आहे. एसटी महामंडळाच्या अनेक जागा रिक्त आहेत; मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त आहेत. अशाच ठिकाणी ही भरती केली आहे, एसटीची इतर पदांसाठीची भरती प्रक्रिया अद्याप राबविलेली नाही, यापुढे अशी भरती प्रक्रिया होण्याची शक्यताही कमी आहे. एसटी महामंडळाकडेही आता आऊट सोर्सिंग प्रमाणेच चालक कम वाहक भरती केली जाते. कोरोनाच्या कालावधीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला होता.
--
आऊटसोर्सिंगने रोजगार
कोरोना कालावधीमध्ये ज्या युवकांना थेटपणे चालक कम वाहक पदांमध्ये अनुभवाच्या आधारावर सेवा देण्यासाठी समाविष्ट केले होते. अशी तुकडी आता यापुढेही कार्यरत राहणार आहे. शासनाकडून अशांना आऊटसोर्सिंगने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे आता आदिवासी समाजातील अनुसूचित जातीच्या युवकांना एसटीने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.