
आमदार राणे अचानक ‘अॅक्शन मोडवर’
04396
कणकवली ः येथील तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील माहिती घेताना नितेश राणे. शोजारी संदेश सावंत, मिलिंद मेस्त्री आदी.
आमदार राणे अचानक ‘अॅक्शन मोडवर’
कणकवली तहसीलला भेट; लोकाभिमुख प्रशासनासाठी सूचना
कणकवली,ता. २३ ः लोकाभिमुख प्रशासनासाठी आमदार नितेश राणे सोमवारी (ता.२२) अचानक ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. सोमवारी (ता.२२) दुपारी साडेबाराला त्यांनी अचानक येथील तहसील कार्यालयाला भेट देऊन प्रशासनावर अंकुश ठेवला. राज्यातील शिंदे - फडणविस सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचले पाहिजे यासाठी लोकाभिमुख प्रशासन असावे, ज्या कार्यालयात कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यावर काही तोडगा काढून मतदार संघातील जनतेला शासकीय कामासाठी हेलपाटे नको, अशी भूमिका आहे, असे मत आमदार राणे यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
कणकवली तालुक्यात १०५ महसुली गावे आहेत. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी होते. त्यात चार दिवसांपुर्वी पुरवठा विभागातील तालुक्यातील शिधापत्रिका धारकांचा आॅनालईन डेटा डिलिट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे आमदार श्री. राणे हे वैभववाडी येथे जात असताना अचानक तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार आर. जे. पवार यांच्या दालणात पाहणी केली असता तहसीलदार काही कामानिमित्त सुटीवर होते. दरम्यान, नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांनी आमदार राणेंची भेट घेतली. कामांचा वेग वाढवू व तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ, असे त्यांनी आमदार राणे यांना सांगितले.
तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला राणे यांनी भेट दिली. त्या विभागातील कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. दोन दिवसांत झालेली चुक सुधारा पुन्हा भेट दिल्यावर असे काही दिसता कामा नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांनी प्रवेश केला. या कार्यालयात अनेक खरेदी- विक्रीच्या नोंदणी, दस्त नोंदणी होते; पण, राज्यभरात सर्व्हेची समस्या असल्याने नागरिकांना मागे परतावे लागले होते. या तक्रारी कशामुळे झाल्या याची माहिती श्री. राणे यांनी घेतली. याबाबत संबंधीत मंत्र्याशी चर्चाकरून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांना सतत त्रास होतो. त्या कार्यालयात नितेश राणे यांनी भेट दिली. तेव्हा अधिकारी कामानिमित्त मुंबईला होते. पदे रिक्त असल्याने ओरोस येथील मुख्यालयातून एक वरिष्ठ कर्मचारी सेवेत पाठविले होते. त्यांना या कार्यालयातील काही कामकाजाची माहिती नव्हती. त्यामुळे रिक्त जागांची माहिती घेऊन आपण ही समस्या मार्गी लावू, असे राणे यांनी सांगितले. भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिन मोजणी, नकाशा, सातबाराचे वारंवार उद्भवणारे प्रश्न या समस्या निर्माण होऊ नयेत अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे आदी उपस्थित होते.
---
यंत्रणेतील त्रुटी सरकारपर्यंत पोहचवू
या भेटीनंतर बोलताना श्री. राणे म्हणाले, ‘‘राज्यातील सरकारचे काम पारर्दशक आहे. महसुलच्या काही विभागात रिक्त पदे असल्याने जनतेची कामे रखडत आहेत. ही बाब लक्षात आल्याने यावर काही पर्याय निघेल का याची पाहणी केली. मी आमदार या नात्याने जनतेला त्रास होऊ नये ही काळजी घेण्यासाठी शासकीय कामकाज आणि प्रशासनातील अडचणी समजून घेतल्या. संबंधीत यंत्रनेतील काही त्रुटीची माहिती घेतली. त्यावर सरकारमधील मंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’’