
भाजपमुळे वेतोरे गावात विकासगंगा
04449
वेतोरे ः सबनीसवाडी साकव कामाच्या भूमिपूजन प्रसंगी राजन तेली, बाळू देसाई, स्मिता दामले आदी.
भाजपमुळे वेतोरे गावात विकासगंगा
राजन तेली; सबनीसवाडी साकव कामाचे भूमिपूजन
कुडाळ, ता. २३ ः केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दोन कोटी रुपयांचा निधी वेतोरे गावाला प्राप्त झाला आहे. भाजपच्या माध्यमातून विविध विकासकामे होत असून ही वेतोरेवासीयांसाठी विकासगंगा आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
वेतोरे-सबनीसवाडी (ता. वेतोरे) येथील साकवाचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नुकतेच झाले. हा लोखंडी साकव जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे सबनीसवाडी येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या साकवाच्या कामाची मागणी कित्येक वर्षांपासून होत होती.
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारादरम्यान जिल्हाध्यक्ष तेली यांनी सबनीसवाडी साकव मंजूर करण्याचे अभिवचन ग्रामस्थांना दिले होते. ग्रामस्थांनीही भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देत संपूर्ण वेतोरे ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात दिली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष तेली यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून या साकवासाठी ५७.६० लाख रुपयांचा निधी मंजूर करून वचनपूर्ती केली. याबाबत ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांनी पालकमंत्री चव्हाण तसेच भाजप सरकारचे आभार मानले.
या भूमिपूजन प्रसंगी ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवीला जिल्हाध्यक्ष तेली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर साकवाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला अध्यक्षा स्मिता दामले, वेतोरे सरपंच प्राची नाईक, तालुका उपाध्यक्ष दीपक नाईक, उपसरपंच संतोषी गावडे, माजी चेअरमन विजय नाईक, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार, बुथ अध्यक्ष नितीन गावडे व विरोचन धुरी, ग्रामपंचायत सदस्य यशश्री नाईक, प्रकाश गावडे, विक्रम सावंत, साक्षी राऊळ, विनायक गावडे, सीता शिरोडकर, तुषार नाईक, सुजाता वालावलकर, माजी सरपंच राधिका गावडे व नेहा गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण राऊळ, कोमल नाईक, सविता जाधव, स्वप्नाली सावंत, माजी उपसरपंच राधाकृष्ण वेतोरेकर, अनिल नाईक, ताता गावडे, अरुण राऊळ, प्रभाकर गावडे, जनार्दन गावडे, राहुल सबनीस, बंड्या गावडे, मनीषा धुरी उपस्थित होते.
--
निधीमुळे मानले भाजपचे आभार
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत १.०३ कोटी रुपयांचा निधी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने १ कोटींचा निधी साकव, रस्ते, शाळा दुरुस्ती, देवस्थान सुशोभीकरण आदी विकासकामांसाठी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी भाजप सरकारचे आभार व्यक्त केले.