‘कलाध्यापक’च्या उपाध्यक्षपदी सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कलाध्यापक’च्या उपाध्यक्षपदी सामंत
‘कलाध्यापक’च्या उपाध्यक्षपदी सामंत

‘कलाध्यापक’च्या उपाध्यक्षपदी सामंत

sakal_logo
By

04466
बी. जी. सामंत

‘कलाध्यापक’च्या उपाध्यक्षपदी सामंत
मालवण : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणेच्या उपाध्यक्षपदी येथील टोपीवाला हायस्कूलचे कलाशिक्षक बी. जी. सामंत यांची बिनविरोध निवड झाली. चिखलदरा येथे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे संघाची २०२३ ते २०२८ पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच येथील टोपीवाला हायस्कूलचे ज्येष्ठ कलाशिक्षक बलराम सामंत यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश नेवगी, सहसचिव एस. व्ही. कोरे, उपाध्यक्ष प्रकाश महाभोज हे उपस्थित होते. सामंत यांनी संघटनेच्या सर्व आंदोलनात राज्यात व जिल्ह्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. जिल्हा संघाचे सचिव, महामंडळाचे विभागीय सहकार्यवाह, विभागीय उपाध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली आहेत. सामंत यांच्या निवडीने जिल्ह्यातील कलाशिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथमच हे पद मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
..............
देवगडमध्ये ५१ जणांचे रक्तदान
देवगड ः येथील फ्रेंड्स सर्कल आणि सिंधू रक्तमित्र शाखा देवगडच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. तर २५ जणांची नेत्र चिकित्सा करण्यात आली. येथील स्नेहसंवर्धन मंडळाच्या सभागृहात रक्तदान आणि नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्‌घाटन डॉ. सुनील आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा रक्तपेढीचे डॉ. मनोज पवार व त्यांचे सहकारी, सिंधू रक्तमित्रचे आणि फ्रेंडस सर्कल मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सिंधू रक्तमित्रचे उपाध्यक्ष व येथील शेठ म. ग. हायस्कूलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी पंढरीनाथ आचरेकर यांचा त्यांनी आतापर्यंत ४५ वेळा रक्तदान केल्याबद्दल शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबीर यशस्वी होण्यासाठी फ्रेंड्स सर्कल आणि सिंधू रक्तमित्र देवगड शाखेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यावेळी सिंधू रक्त मित्र तसेच जिल्हा रक्तपेढीमार्फत फ्रेंडस सर्कल मंडळाला त्यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
--
कृषी पुरस्कारांसाठी प्रस्‍तावांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनाच्‍या कृषी विभागामार्फत २०२२ या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.
................
मतदारांना ‘व्होटर हेल्पलाईन अ‍ॅप’
अलिबाग ः मतदानकार्डमधील त्रुटी दूर करण्यासाठी तहसील कार्यालय, तलाठी, बीएलओकडे जाणे, संबंधित कागदपत्रे देणे. त्यानंतर मतदान कार्डमधील चुकीची दुरुस्ती करणे या धावपळीतून सुटका करण्यासाठी निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा आधार घेत व्होटर हेल्पलाईन अ‍ॅप सुरू केले आहे. मोबाईलच्या एका क्लिककवर घरबसल्या मतदान कार्डवरील चुका आता दुरुस्‍त करता येणार आहेत. जिल्ह्यातील एक लाख सहा हजार १५५ जणांनी अ‍ॅपमार्फत नोंदणी केल्याचे समोर आले आहे. आधी मतदान ओळखपत्र साध्या पद्धतीचे होते. ते हाताळताना मतदारांना अडचणी जाणवत होत्या. निवडणूक आयोगाने ओळखपत्र सहजरित्या हाताळता यावे यासाठी स्मार्ट कार्डची सुविधा उपलब्‍ध केली आहे. मतदारांना रंगीत छायाचित्रासह स्मार्ट कार्ड देण्यात येते. मतदान ओळखपत्रामध्ये नाव, आडनाव, पत्ता, लिंग तसेच छायाचित्र अशा अनेक प्रकारच्या त्रुटी निर्माण झाल्याने चुकीची दुरुस्ती करण्यासाठी गाव पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत.
--
रस्ता सुरू करण्यासाठी आंदोलन
नेरळ ः कर्जत नगरपरिषदेतील दहिवली येथे तातेरे फ्लोरेसकडून इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून बंद आहे. या भागात काही शेतकऱ्यांसह माजी आमदार सुरेश लाड यांचीही शेती असल्याने रस्‍त्‍याच्या दुरवस्‍थेमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. अपूर्ण कामामुळे अनेक दुचाकीस्‍वारांना तोल जाऊन दुखापत झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत नगरपरिषदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. लाड यांच्या आंदोलनानंतर काही वेळात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दहिवली येथील तातेर फ्लोरेसकडून इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडे जाणारा रस्त्याला २८ ऑक्टोबर २०२२ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली. यासाठी एमएमआरडीएकडून चार कोटी ६३ लाख ९३ हजार ६९८ निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार असून रचना कन्स्ट्रक्शनला काम दिले आहे.
------
बामणोली धरण शेतकऱ्यांसाठी वरदान
रसायनी : रसायनीतील जांभिवली येथील बामणोली धरण पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. दुबार हंगाम संपल्यानंतरही धरणात जवळपास ३५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. या पाण्याचा पशु-पक्षी, गुरांना उपयोग होत आहे.
जांभिवली गावातील घेरा माणिकगडाच्या पायथ्याशी सुमारे ३९ वर्षांपूर्वी बामणोली धरण बांधण्यात आले. धरणाच्या पाण्याचा जांभिवली, सवने, चावणे आदी गावे आणि लगतच्या वाडी-वस्‍तीतील शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे. खरीप हंगामातील भात पिकानंतर शेतकरी रब्बी हंगामात भात पिकाबरोबर भाजीपाल्याचे पीक घेऊ लागले आहे. सिंचनाचे खात्रीचे साधन मिळाल्याने जांभिवली परिसरातील शेती चांगलीच बहरली आहे. बारा महिने जनावरांना हिरवा चारा मिळू लागल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे.
------
04482
तुषार पवार

तुषार पवार यांचे यश
मालवण : तालुक्यातील नांदोस-चव्हाणवाडी येथील रहिवासी असलेल्या तुषार पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्याने संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केली. तुषार हे सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचले आहेत. त्यांचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी-विक्री संघात काम करतात, तर आई घरी शिवणकाम करते. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. चर्मकार समाज उन्नती मंडळाच्यावतीने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.