
-प्रत्येक घरात स्वतंत्र नळ लावले तरी नाही थेंब
३ ( पान २ साठी)
स्वतंत्र नळ लावले तरी नाही थेंब
लांजात जलजीवन मिशनची गती संथ ; कागदावरच पूर्ण
लांजा, ता. २४ ः लांजा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेची कामे संथगतीने सुरू आहेत. यातील बरीचशी काही कामे ही फक्त कागदावरच पूर्ण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना रत्नागिरी जिल्ह्यात राबविली जात आहे. जलजीवन मिशन या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना पुरेसे, दर्जेदार व नियमित पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही योजना जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात पोचवण्याचे लक्ष्य निश्चित केले गेले असले तरी लांजा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेची कामे संथगतीने सुरू आहेत. यातील बरीचशी काही कामे ही फक्त कागदावरच पूर्ण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो याला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी कारणीभूत आहेत, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांनी केला आहे.
केतन भोज यांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जलजीवन कार्यक्रमात लांजा तालुक्यात नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील एकूण ९३ कामे आहेत. त्यामधील बरीच कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. २०२१-२२ मधील कामांना निधी मंजूर करूनही अद्यापही ही कामे सुरू झालेली नाहीत. काही गावात स्वतंत्र नळपाणी योजनेची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्ष प्रत्येक घरात स्वतंत्र नळ लावले तरी अद्याप त्या नळातून पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. या सर्व कामावर वरिष्ठ पातळीवरील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्यामुळेच असे प्रकार होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन भोज यांचे म्हणणे आहे.