
दिव्यांगांना तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र
दिव्यांगांना तालुक्याच्या
ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र
पालकमंत्री सामंतांचे आश्वासन ; दापोलीत आढावा बैठक
दाभोळ, ता. २३ ः शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत दिव्यांगाना तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी देवेंदर सिंह यांच्याकडे प्रशांत परांजपे यांनी केली होती. त्यानुसार तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभेल, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी दापोलीतील आढावा बैठकीत दिली.
दिव्यांगाना वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता रत्नागिरी येथे आठवड्यातील एक बुधवार हा वार निश्चित करण्यात आलेला आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता मंडणगड, दापोली, खेडपासून राजापूरपर्यंत असणाऱ्या दिव्यांगाना रत्नागिरी येथे येणे कष्टप्राय असून यामुळे ५० टक्केपेक्षा अधिक दिव्यांगाना शासनाचा कोणताही लाभ मिळत नाही. दापोली तालुक्यात सुमारे ६०० दिव्यांगांपैकी ५० ते ६० टक्के दिव्यांगाना प्रमाणपत्र उपलब्ध झालेले नसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही सवलतीचा किंवा कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून दिव्यांग वंचित राहतात. या विषयावर तत्काळ निर्णय घेत पालकमंत्री सामंत यांनी संबंधित अधिका-यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांची वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी होणारी फरपट थांबणार आहे. प्रत्येक दिव्यांगाना आपापल्या तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहेत.