
आंबा बागायतदारांना हवी सरसकट कर्जमाफी
rat२३p१९.jpg-
०४४८९
रत्नागिरी - पत्रकार परिषदेत माहिती देताना बाबा साळवी व अन्य पदाधिकारी.
---------
आंबा बागायतदारांना कर्जमाफी द्यावी
बाबा साळवी यांची मागणी; उद्या मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन
रत्नागिरी, ता. २३ : शासन आपल्या दारी, या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी आम्ही सर्व आंबा बागायतदार त्यांची भेट घेणार आहे. गेल्या आठ वर्षामध्ये निसर्ग दृष्टचक्रामुळे आंबा उत्पन्न धोक्यात आहे. यंदा तर १५ टक्केही उत्पन्न नाही. कामगारांचा पगार, फवारणीचा खर्च अंगावर आला आहे. सर्व बागायतदारांचे सुमारे ४०० कोटी कर्ज असले. शासनाने सरसकट आंबा बागायतदारांना कर्ज माफी द्यावी, अशी मागणी आम्ही करणार असल्याची माहिती पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बाबा साळवी यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनेक आंबा बागायतदार उपस्थित होते. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. यंदाही आंबा हंगाम खराब गेला. दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवत असल्याने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. बागेच्या मशागतीसाठी लागणारा खर्च, कामगारांचा पगार आदीमुळे कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. शासनाने नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली आहे. परंतु अद्याप ५ टक्केच शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. उर्वरित ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून ही रक्कम पडलेली नाही. ती केव्हा मिळणार आहे हे माहित नाही. ते मिळावे, ही मागणी तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.
यापूर्वीच्या कर्जाचे पुर्नगठण करून देण्याची घोषणा शासनाने केली होती. शासन त्याचे व्याज भरणार होते. त्याचेही पुढे काही झाले नाही. आंबा बागायतदार कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी करावी, अशी प्रमुख मागणी आहे. शासनाला यासाठी ४०० कोटीची तरतुद करावी लागणार आहे. आतापर्यंत कोकणातील शेतकऱ्यांनी कोणतीच कर्जमाफी मागितलेली नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी भरगोस पॅकेज जाहीर करून आम्हा आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा, ही मागणी आहे.
जूनमध्ये आंबा परिषद घेण्याचा आमचा विचार आहे. तेव्हा आम्ही पुढील निर्णय जाहीर करणार आहे, असेही साळवी यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी हापुसच्या नावाखाली खुलेआम कर्नाटकच्या आंब्याची विक्री सुरू आहे. परंतु यावर नियंत्रण ठेवणाही एकही शासकीय यंत्रणा नाही, ही सर्वांत मोठी दुर्दैवी बाब आहे, अशी खंतही साळवी यांनी व्यक्त केली.
चौकट
कोकण कृषी विद्यापीठ फक्त नावालाच
गेली आठ ते दहा वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. दिवसेंदवस आंब्याचे उत्पन्न घटत आहे. अशा परिस्थितीमध्येही भरघोस आंबा उत्पन्न मिळावे, यासाठी कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करावे, अशी वारंवार मागणी संघाकडुन केली आहे. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोकण कृषी विद्यापिठ हे फक्त नावालाच आहे, अशी टीका बाबा साळवी यांनी केली.