
संस्कृत नाट्यांची पर्वणी घेऊन येत आहे ‘नाट्यानुकीर्तनम्’
rat२३p२३.jpg-
०४५३१
रत्नागिरी : संस्कृत एकांकिकेमधील प्रसंग.
-------------
संस्कृत एकांकिकांचा महोत्सव उद्या
नाट्यानुकीर्तनम् ; फर्ग्युसन कॉलेज, भरत नाट्य संशोधन मंदिरचा उपक्रम
रत्नागिरी, ता. २४ : दुर्मिळ आणि काहीशा दुर्लक्षित होत चाललेल्या संस्कृतसारख्या प्राचीन भाषेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय आणि भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेने ‘नाट्यानुकीर्तनम्’ हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात संस्कृत एकांकिकांचा हा महोत्सव होणार आहे.
या महोत्सवामध्ये रसिकांना भरत नाट्य मंदिर संस्था निर्मित सहवासिन्यः आणि महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेती, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) निर्मित एकांकिका यावच्चन्द्रदिवाकरौ या दोन एकांकिकांचा समावेश आहे. ही एकांकिका पार्वतीबाई पेशवे यांच्या जीवनावर आधारित आहे.
संस्कृत भाषा देववाणी म्हणून संबोधली जाते. ती सर्व भाषांच्या जननीबरोबरच अनेकविध शास्त्रांचे भांडार देखील आहे. विपुल वाङमयाचे वैभव लाभूनही काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. देवधर्म, पोथ्या पुराणापर्यंतच तिला सीमित केले गेले आणि कोणत्याही भाषेला पुनरुज्जीवित करायचे असेल तर नाट्यकलेसारखे जनमानसात पोहोचणारे दुसरे उत्तम माध्यम नाही. मराठी नाट्यसंस्कृतीची जननी असलेल्या संस्कृत नाट्यांना उत्तेजन देण्यासाठी डॉ. रा. ना. दांडेकर संस्कृत एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यांसारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळूनही त्यात सादर होणाऱ्या एकांकिका केवळ त्या स्पर्धेतील एका प्रयोगापुरत्याच मर्यादित राहतात. म्हणूनच स्पर्धेच्याही पलीकडे जाण्याचा दृष्टिकोन मिळावा या विचाराने फर्ग्युसन महाविद्यालय आणि भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेने हा महोत्सव आयोजित केला आहे.
चौकट
५० कलाकारांना संधी
नाट्यानुकीर्तनम् या महोत्सवामुळे जवळपास ५० संस्कृत आणि नाट्यप्रेमी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. महोत्सवामध्ये सादर होणाऱ्या दोन्ही एकांकिका रोजच्या व्यवहारातील विषय हाताळणाऱ्या व अत्यंत सुलभ संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या असल्यामुळे जास्तीत जास्त रसिकांपर्यंत संस्कृत भाषा पोहोचतील.