नवी जागा नाईलाजास्तव स्विकारली

नवी जागा नाईलाजास्तव स्विकारली

04468
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत उपस्थित हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, अजय जाधव व अन्य. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

नवी जागा नाईलाजास्तव स्विकारली

हॉकर्स संघटना; मॅनेज झाल्याचे आरोप खोटे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः मोती तलावाकाठचा बाजार आम्हाला सोईचा होता; मात्र, होळीच्या खुंटावर जाण्यापेक्षा गोडाऊन परिसरातील जागा नाईलाजास्तव स्वीकारावी लागली; मात्र आजही तलावाकाठील जागेसाठीचा आग्रह सोडलेला नाही. मंत्री दीपक केसरकरांच्या दबावाखाली असलेल्या पालिका प्रशासनाकडून कारवाईची धमकी दिल्याने ती जागा सोडली, असा आरोप हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज येथे करण्यात आला. आम्ही कोणालाही मॅनेज झालो नाही किंवा कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही. दोन आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी व आवश्यक असलेल्या सुविधा पूर्ण न झाल्यास पुन्हा तलावाच्या काठी बाजार हलवू, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
येथील आठवडा बाजाराच्या नव्या जागेवरून राजकीय पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवर आज हॉकर्स संघटनेकडून जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. यावेळी जिल्हा सेक्रेटरी महेश परुळेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अजय जाधव, महेश बेळगांवकर, आलिफ खान, बाबासाहब दर्गावाले, राजू लेंगडे, नाझिन पटेल आदी उपस्थित होते.
ॲड. निंबाळकर म्हणाले, ‘‘येथील आठवडा बाजार हा मोती तलावाकाठीच राहावा, यासाठी आमचे शेवटपर्यंत प्रयत्न होते. मंत्री केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब व अन्य राजकीय पदाधिकारी यांना निवेदने देऊन चर्चा केली. शहरातील गांधी चौक परिसरात हा बाजार भरवण्याबाबतही आम्ही मंत्री केसरकर यांच्याकडे विनंती केली होती. मात्र, ती जागा सुद्धा मान्य करण्यात आली नाही. शेवटी मंत्री केसरकर यांनी आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्याबाबत आपली पूर्ण ताकद वापरली. पालकमंत्री चव्हाण आणि श्री. परब यांनीही आपली ताकद वापरून आठवडा बाजार तलावाकाठीच राहावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. मात्र, हॉकर्स संघटना मॅनेज झाली असे काहींचे म्हणणे चुकीचे आहे. मुळात तुमच्या राजकारणात आम्हाला ओढू नका. तुमचे हेवेदावे तुम्ही पाहा. फेरीवाल्याचे हित हेच आमचे ध्येय आहे."
ते पुढे म्हणाले, "मोती तलावाकाठी बाजार भरताना कौन्सिलचा ठराव झाला, याबाबत आम्ही प्रशासनाकडे माहिती मागितली असता त्यांनी तसा ठराव झाला नसल्याचे सांगितले. जर तसा ठराव झाला असेल तर त्या ठरावास अनुसरून जिल्हा प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी. आता बाजार भरत असलेली जागा गैरसोयीची आहे हे आम्हाला मान्य आहे. तेथे असलेल्या पुरातन झाडांमुळे अपघात होऊ शकतो. गोडाऊनच्या मागच्या भागात दिलेल्या जागेत पावसात चिखल होणार आहे. त्यामुळे याबाबत आम्ही प्रशासनाचे तसेच केसरकर यांचेही लक्ष वेधले असता सर्व गैरसोयी लवकरच दूर करणार असा शब्द त्यांनी दिला आहे. सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीसाठी काही लोक अनुपस्थित राहिले. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घ्यायची नाही."
--------------
चौकट
...तर आम्ही केव्हाही तयार
श्री. जाधव म्हणाले, "पालिका प्रशासन मंत्री केसरकर यांच्या दबावाखाली वावरत आहे. तलावाकाठची जागा आम्ही सोडायला तयार नसताना प्रशासनाने पोलिसांच्या कारवाईची भीती दाखविली. त्यामुळे आम्ही तलावाकाठची जागा सोडली. मात्र, आजही कोण तलावाकाठी बाजार भरवण्यासाठी पुढे येत असल्यास आम्ही केव्हाही तयार आहोत."
-----------------
चौकट
उद्यानासमोरील जागेबाबत मागणी
आठवडा बाजारासाठी होळीचा खुंट ही जागा सुचवली होती. मात्र, नागरिकांची होणारी गैरसोय पाहता फेरीवाल्यांच्या संमतीनेच आत्ताची जागा निवडली. यात शिवउद्यानाच्या समोरील रिकामी जागाही आमच्या मागणीचा भाग आहे. कपडे व अन्य व्यापाऱ्यांसाठी ती जागा आम्ही ठेवली आहे, असेही ॲड. निंबाळकर म्हणाले.
-----------------
चौकट
निवडणुकीवेळी ताकद दाखवू
केवळ व्यापाऱ्यांचे व ग्राहकांचे हित आम्ही पाहत आहोत. मात्र, राजकीय पक्षांकडून आठवडा बाजाराचे केवळ राजकारण केले जात आहे. मात्र, आमच्या हिताच्या विरोधात जो जाईल, त्यांना निवडणूकीच्या वेळी आमची ताकद दाखवू, असा इशाराही ॲड. निंबाळकर यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com