
परशुराम घाटात एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली
पान १ साठी )
०४५५५
परशुराम घाटातून
एक मार्गिका वाहतूक
खेड हद्दीत गती मंदावली; ३१ मेचा मुहूर्त गाठण्याची धावपळ
चिपळूण, ता. २३ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. चिपळूण हद्दीतील ईगल कंपनीमार्फत एक लेनचे काम मार्गी लागले आहे. खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाला अजूनही अपेक्षित गती मिळालेली नाही. या भागात दोन्ही लेनचे काम बाकी आहे. ३१ मेअखेर संपूर्ण परशुराम घाटातील काँक्रिटीकरणाची एक लेन सुरू करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात परशुराम घाट सुरवातीपासून अडचणीचा बनला आहे. एकीकडे २३ मीटर उंचीची दरड व दुसरीकडे दरीचा धोका असल्याने या कामात प्रत्येक टप्प्यावर अडचणी येत गेल्या. तब्बल २ वर्षे सुरू असलेल्या या कामाला ६ महिन्यांपूर्वी वेग आला. पहिल्या टप्प्यात दरीच्या बाजूने ९०० मीटर संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यानंतर दरडीच्या बाजूने खोदाई केली. अतिशय धोकादायक परिस्थितीत काम करताना दरडीखाली पोकलेन सापडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सातत्याने चौपदरीकरणाचे काम सुरू असून, चिपळूण हद्दीतील बहुतांश काम अंतिम टप्प्यात आले आहे. या हद्दीत ईगल कंपनीमार्फत एक लेनचे काम पूर्ण झाले आहे, मात्र खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीच्या कामाला अजूनही गती आलेली नाही. या हद्दीत कठीण खडक तोडण्याचे काम अजूनही सुरू आहे. त्यासाठी दोन ब्रेकरने खडक तोडण्याचे काम सुरू असले तरी ते पूर्णत्वास गेलेले नाही. शिवाय दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम बाकी आहे; परंतु आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घाटातील किमान एक लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्यामध्ये कल्याण टोलवेजचे काम अजूनही मागे पडल्यासारखेच आहे.
चौकट
काही दिवस लांबणीवर
ज्या पद्धतीने खेड हद्दीत यंत्रणा राबवायला हवी होती, त्यानुसार यंत्रणा दिसून येत नाही. त्यामुळे परशुराम घाटातील काम आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्यास वाहनधारकांसाठी पुन्हा एकदा चिखलातून प्रवासाचे दिव्य आहे.