भोंगळ नियोजनामुळे दिव्यांगांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंगळ नियोजनामुळे दिव्यांगांचे हाल
भोंगळ नियोजनामुळे दिव्यांगांचे हाल

भोंगळ नियोजनामुळे दिव्यांगांचे हाल

sakal_logo
By

04580
वेंगुर्ले ः तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झालेली गर्दी.
04581
वेंगुर्ले ः स्वतंत्र बैठक व्यवस्था नसल्याने दिव्यांगांना असे ताटकळत उभे राहावे लागले.


भोंगळ नियोजनामुळे दिव्यांगांचे हाल

वेंगुर्लेत नाराजी; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातील प्रकार

वेंगुर्ले, ता. २३ ः येथील तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत आज आयोजित ‘शासन आपल्या दारी’ महास्वराज्य अभियान शिबिर या कार्यक्रमात तहसील कार्यालयाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका नागरिक, दिव्यांग व वृद्धांना सहन करावा लागला. उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
वेंगुर्ले तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावागावांतून आलेल्या नागरिकांकडून तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला अर्ज भरून घेतले गेल्याने एकच गर्दी झाली. दिव्यांग व वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी प्रांताधीकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार संदीप पानमंद, गटविकास अधिकारी मोहन भोई, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पशुधन विकास अधिकारी विदयानंद देसाई, एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीमती सामंत, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.
तहसीलदार ओतारी यांनी प्रास्ताविक केले. शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान अंतर्गत तालुक्यासाठी विविध विभागांतील १० हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले होते; मात्र तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांनी उत्कृष्ट काम केल्याने अभियान कालावधीत एकूण १२,२६६ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातील ६५११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे, तर उर्वरित ५७५५ लाभार्थी प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच उत्कृष्ट काम झाल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लाभार्थ्यांचे कौतुक केले.
................
चौकट
‘दिव्यांग, वृद्धांना नाहक त्रास का?’
या कार्यक्रमात जे दाखले वितरित करण्यात आले, ते दरवर्षी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत वितरित करण्यात येतात, मग असा कार्यक्रम आयोजित करून भर उन्हातून नागरिक, दिव्यांग, वृद्धांना तहसील कार्यालयात का बोलावण्यात आले, असा प्रश्न उपस्थितांनी केला. तहसील कार्यालयाच्या नियोजनाचा फटका सामान्यांना सहन करावा लागला. काहींना तर या ठिकाणी का बोलावले हेच माहीत नसल्याचे आढळले.