
पान एक-विनयभंगानंतर तरुणीस मारण्याचा प्रयत्न
विनयभंगानंतर तरुणीस मारण्याचा प्रयत्न
बांद्यात गुन्हा; पसार संशयिताचा शोध सुरू
बांदा, ता. २३ ः नदीकाठी असलेल्या शेतातील पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेलेल्या युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार सावंतवाडी तालुक्यातील एका गावात घडला. मात्र, त्या युवतीने आरडाओरडा केल्याने प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने नराधमाने तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यात त्या पीडित युवतीने मोठ्या धाडसाने आपली सुटका केली; अन्यथा यात तिचा जीव गेला असता. या घटनेने सावंतवाडी तालुका हादरला आहे. संबंधित युवती अत्यवस्थ असून, तिच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी संबंधित पीडित युवतीने बांदा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. बाबलो शंकर वरक (वय २८) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. या घटनेस २४ तास झाले तरीसुद्धा संशयित मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सावंतवाडी तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय युवती शेतातील पंप बंद करण्यासाठी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गेली होती. तिच्या वाटेवर दबा धरून बसलेल्या बाबलो वरक या तरुणाने तिच्यावर पंप चालू करताना शेतातच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरडा केल्याने प्रकरण अंगलट येणार या भीतीने त्याने तिला तेथेच हाताने ढकलून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. बाबलोने तिच्या गळ्यावर पाय ठेवत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आपला जीव जाईल, या भीतीने पीडित युवतीने काही काळ श्वास रोखून धरला. तिचा जीव गेला असेल, असे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला. नंतर त्या युवतीने तेथून धावत आपले घर गाठले व सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तिला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तिच्या गळ्यावर गळा दाबलेल्याचे व्रणसुद्धा होते. डॉ. पाटील यांनी याबाबतची माहिती बांदा पोलिसांना दिली. युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मध्यरात्री उशिरा पीडित युवतीच्या नातेवाइकांनी बांदा पोलिसांत फिर्याद दिली. यावेळी त्या गावातील अनेक ग्रामस्थ पोलिस स्थानकात दाखल झाले होते. त्यानुसार बाबलो वरक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण बांदा पोलिसांसह अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे मोहिमेवर आहेत.
.............
चौकट
कसून तपास सुरू
घटना घडून २४ तास झाले, तरीही संबंधित मोकाट असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. सकाळी बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. बांदा पोलिसांनी नराधम राहत असलेल्या घरीसुद्धा पाहणी केली. रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने गावातून पळ काढला. आज सकाळपासून त्याचा शोध घेण्यासाठी बांदा पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. दिवसभर हे पथक त्याचा शोध घेत होते. संशयित हा मोबाईल वापरत नसल्याने शोध घेण्यास अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.