
रक्कम दामदुप्पटच्या आमिषाने माजगावातील तरुणास गंडा
रक्कम दामदुप्पटच्या आमिषाने
माजगावातील तरुणास गंडा
७६ हजाराची ऑनलाईन फसवणूक
सावंतवाडी, ता. २३ ः ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणे घडत असतानाच माजगाव येथील एका तरुणाची दामदुप्पट रकमेच्या आमिषाने फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. पाचशे रुपयांत तब्बल वीस हजार रुपये देतो, असे सांगून एका कंपनीच्या नावावर अज्ञाताने माजगाव येथील एका इलेक्ट्रिशियनला तब्बल ७६ हजार ४१७ रुपयांना ऑनलाईन गंडा घातला. याबाबत माजगाव-हरसावंतवाडा येथील भूषण दळवी यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, माजगाव येथे राहणारे दळवी हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका कंपनीच्या नावाने विनंती आली. यात तुम्ही पाचशे रुपये आमच्याकडे जमा केलात तर तुम्हाला वीस हजार रुपये मिळणार आहेत, असे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी पहिले पाचशे रुपये पाठविले. त्यानंतर तुम्हाला आणखी पैसे मिळणार आहेत, असे सांगून आणखी पैशांची मागणी केली. यावेळी दळवी यांनी पाच-पाच हजार रुपये असे करून वेगवेगळ्या अकाउंटवरून तब्बल तीस हजारांहून अधिक रक्कम पाठविली. त्यानंतर तुम्हाला मिळणारे पैसे हे विदेशी चलनात आहेत. त्यामुळे ते भारतीय चलनात करण्यासाठी चाळीस हजार रुपये पाठवा, असा संदेश आला. त्यानंतर दळवी यांनी पुन्हा त्यांना चाळीस हजार रुपये पाठविले; मात्र संबंधिताकडून पैशांची मागणी होतच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे दळवी यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गंडा घालणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.