हापूसला यंदा निर्सगाने तारले

हापूसला यंदा निर्सगाने तारले

04677
जामसंडे ः येथील बाजारात हापूस आंबा विक्रीस उपलब्ध आहे. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


हापूसला यंदा निर्सगाने तारले

बहुतांश पिक हाती; पुर्वमोसमी पाऊस न झाल्याचा फायदा

संतोष कुळकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः आपल्या अवीट चवीने साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या ‘देवगड हापूस’ला यंदाच्या हंगामात सुरूवातीला निसर्गाने फटकारले असले तरी अखेर चांगला दर मिळण्यासह निसर्गानेच सावरले आहे. मॉन्सुनपुर्व पावसाने हजेरी न लावल्याने बहुतांशी आंबा शेतकऱ्यांच्या हाती येण्यास मदत झाली. त्यामुळे बागायतदारांवर पुन्हा एकदा निसर्गानेच कृपा केल्याचे चित्र आहे. यामुळे आंबा बागायतदारांना नुकसानीतुन काहीसा दिलासा मिळणार आहे; मात्र तुलनेत काही बागायतदारांना उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसवणेही कठीण जाण्याची शक्यता आहे.
गेली काही वर्षे अनेक अडथळे पार करीत आंबा हंगामाची वाटचाल सुरू आहे. विविध कारणांनी हापूस आंबा संकटात सापडतो. कधी अवकाळी पाऊस, बदलते वातावरण तर कधी किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे बागायतदार चिंताग्रस्त असतात. यंदा हंगामाच्या सुरूवातीला नैसर्गिक आपत्तीने बागायतदारांना वारंवार सतावल्याचे चित्र होते. हंगामाला सुरूवातीपासूनच निसर्गाची अपेक्षित साथ मिळाली नाही. सुरूवातीला झाडांना मोहोर येण्याची प्रक्रीया लांबली. त्यातच काही भागात अपेक्षित मोहोर व फलधारणा झाली नाही. एकूणच उत्पादनात मोठी घट होण्याच्या शक्यतेने आंबा बागायतदार चिंतेत पडले. यंदा हंगामाचे काय होणार याची चिंता बागायतदारांना सतावत होती. विविध कारणांनी कोकणातील हापूसचे उत्पादन घटणार असल्याची बागायतदारांची सुरूवातीपासुनच ओरड होती. यंदा उत्पादन कमी होणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याने सुरूवातीपासूनच बाजारात आंब्याला चांगला दर मिळाला. वाशी फळबाजारातही आंब्याचा दर बऱ्यापैकी टिकून होता. उत्पादन कमी असल्यावर चांगला दर मिळतो हा सर्वच बाबतीत ठोकताळा मानला जातो. हापूसलाही याचा लाभ झाला. उत्पादन कमी असल्याचे वारंवार बोलले जात असल्याने दर खाली आले नाहीत. स्थानिक पातळीवर विकला जाणारा आंबा आजही चढ्या दरानेच विकला जात आहे. ज्यांच्याकडे बराच आंबा होता त्यांना वाढीव दराचा लाभ झाल्याचेही चित्र होते. वाशी बाजाराव्यतिरिक्त बागायतदारांनी अन्य प्रमुख शहरात जावून आपला आंबा विकला. यातुन बागायतदारांना चांगला भाव मिळाल्याचे दिसले. अखेरपर्यंत पाचशेच्या खाली डझनचा दर आलेला नव्हता. प्रतवारी केलेल्या आंब्याला सुमारे आठशे रूपयेपेक्षा अधिक डझनचा भाव मिळत होता. कॅनिंगच्या आंब्याचाही दर सुरूवातीपासून चांगला राहीला. सुरूवातीला आंब्यावर निसर्गाची अवकृपा झाली असली तरी मॉन्सुनपुर्व पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने आलेले सर्व पीक बागायतदारांच्या हाती येण्यास मदत झाली. उत्पादन कमी झाले असले तरी वाढीव दराने बागायतदारांना काहीसा हात दिला आहे. झालेल्या नुकसानीतून काहीसे सावरायलाही यातून मदत होणार आहे; मात्र मोजकीच कलमे असणाऱ्या छोट्या बागायतदारांना उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसवणे कठीण जाण्याची शक्यता वाटते. काही मोठ्या बागायतदारांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न न मिळाल्याचे सांगितले जाते. बरेचदा छोट्या बागायतदारांच्या कुटुंबाची हंगामावरच भिस्त असते. हंगाम ढेपाळल्यास पुढे वर्षभर कुटुंब चालवताना त्यांना कसरत करावी लागते. नुकसान भरपाई मिळतानाही अनेकदा छोटे बागायतदार निकषांचे बळी ठरतात. नुकसान भरपाई देताना त्यांचा गांभिर्याने विचार होताना दिसत नाही.
...................................
चौकट
प्रक्रीया उद्योग अडचणीत
हंगामातील पहिल्या टप्यातील आंबा अडचणीत सापडल्याने हापूसचे ‘कॅश’ पीकच बागायतदाराच्या हातून निसटल्यासारखे झाले. त्यातूनही सावरत हंगामाची खडतर सुरूवात झाली. उत्पादन घटल्याने प्रकीया उद्योगाला आंबा मिळेल की नाही, अशी शक्यता दिसू लागली. पर्यायाने प्रक्रीया उद्योग अडचणीत येण्याबरोबरच पुरक व्यवसायही कोलमडले.
...............................
चौकट
अवकाळीची मेहरबानी
यंदा अवकाळी पावसापासून आंबा पीक बचावले. अजून येथे अवकाळी पाऊस झालेला नाही. त्यामुळे सुरूवातीला निसर्गाने फटकारले असले तरी अखेरच्या टप्यातील उत्पादन बागायतदारांच्या हाती येण्यास मदत झाली. आता पावसाच्या भीतीने बागायतदारांची धांदल वाढली आहे. हंगाम उतरार्धाकडे आहे.
........................................
चौकट
कॅनिंगला विक्रमी दर
यंदाच्या आंबा हंगामाची सुरूवात काहीशी ‘कासव’ गतीने सुरू झाली असली तरी आंबा हंगामाने अखेर शर्यत जिंकल्याचे चित्र आहे. यंदा कॅनिंगला ऐतिहासिक उच्चांकी असा विक्रमी भाव मिळाला. आजवर कधीही न मिळाला होता एवढा सुमारे ७२ रूपये किलो इतका दर दिला जात होता. याचा बागायतदारांना लाभ झाला. सध्या ४८ रूपये दर स्थीर आहे.
............................................
चौकट
ऑनलाईन यंत्रणेचा फायदा
आंबा विक्री करताना अलिकडे ऑनलाईन यंत्रणेचा बागायतदारांना फायदा होताना दिसतो. शहरातील ग्राहकाला नेटबँकीच्या आधारे ग्राहकाच्या खात्यात थेट रक्कम पाठवता येते. त्यामुळे बागायतदाराला आंबा पाठवण्यास सोपे जात असल्याचे चित्र आहे. यातून ग्राहक ते शेतकरी अशी विक्री व्यवस्था वृध्दींगत होत आहे.
.................................................
यंदाची स्थिती
* पहिल्या टप्यातील आंब्याला हवामानाचा फटका
* पालवीमुळे मोहोर येण्याची प्रक्रीया लांबली
* पहिल्या टप्यातील मोहोरातून अपेक्षित फलधारणा नाही
* कॅनिंग आंब्यावर मर्यादा, पर्यायाने दर वधारले
* प्रक्रीया उद्योगासाठी हापूस आंबा अपुरा
* प्रक्रीया उत्पादनांचे दर वधारण्याची भिती
* आंब्याशी निगडित पुरक व्यवसाय कोलमडले
* हंगामातील सर्व आंबा बागायतदारांच्या हाती
.........................
कोट
04681
यंदाच्या आंबा हंगामात सुरूवातीपासूनच आवक कमी राहिल्याने वाशी फळबाजारात दर टिकून होते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ४० टक्के आंबा कमी आला. देवगड, मालवण, वेंगुर्लेचा आंबा संपत आला आहे. ३० मेपर्यंत रत्नागिरीतील तर ५ जूनपर्यंत रायगड, बाणकोट, अलिबाग भागातील आंबा संपेल. गुजरात आंबाही येत असून त्यानंतर तो संपेल. बागायतदारांना चांगल्या दराचा फायदा झाला असला तरी उत्पादन घटल्याने काहीसे नुकसानही सोसावे लागेल. यंदा आंबा हंगाम तुलनेत बरा गेला.
- संजय पानसरे, आंबा व्यापारी, वाशी फळबाजार
................
04682
यंदा कॅनिंग व्यवसायाला आंबा तुलनेत कमी मिळाला. कॅनिंगचे यंदा प्रथमच विक्रमी असे वाढीव दर होते. सुमारे ७२ रूपये किलोपर्यंत कॅनिंगचा दर गेला होता. सध्या ४८ रूपयापर्यंत दर दिला जात आहे. सद्यस्थितीत दिवसाकाठी तीन ते चार ट्रक आंबा कॅनिंगला येत आहे. हीच संख्या गतवर्षी ३० ट्रकापर्यंत होती. यंदा सुमारे २० टक्केच इतके आंबा उत्पादन झाले. त्यातच आंब्याला चांगला भाव मिळाल्याने प्रक्रीया उद्योगाकडे आंबा कमी वळला. वाढीव दर देऊनही कॅनिंगला अपेक्षित आंबा मिळू शकला नाही.
- मंगेश वेतकर, कॅनिंग व्यवसायिक, पडेल (देवगड)
.......................
04683
यंदा सुमारे २० टक्के इतकेच आंबा उत्पादन झाले. मार्चमध्ये ज्यावेळी आंबा भरपूर होता त्यावेळी फळबाजारातील दर खाली आले होते. त्यानंतर पुन्हा दर वाढले. आजही वाढीव दर आहेत. कॅनिंगलाही यंदा ऐतिहासिक दर मिळाला. यापूर्वीही कधीही इतका दर कॅनिंगसाठी मिळाला नव्हता. फळबाजाराबरोबरच खासगी स्वरूपात आंबा विक्री करणाऱ्यांना अधिक दराचा फायदा झाला. मार्चमध्ये दर चांगले असते तर आणखी सोयीचे झाले असते. उत्पादन घटल्याने बागायतदारांचा उत्पन्न आणि खर्च याची सांगड बसणे कठीण असले तरी दरामुळे दिलासा मिळेल. दरवर्षीच्या तुलनेत २० टक्केच पेट्या आंबा मिळाला.
- किरण टेंबुलकर, आंबा बागायतदार, किंजवडे (देवगड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com