वस्तू स्विकारण्यासाठी पालिकेत केंद्र

वस्तू स्विकारण्यासाठी पालिकेत केंद्र

१० (टूडे पान १ साठी, संक्षिप्त)

निरुपयोगी वस्तू संकलनासाठी पालिकेत केंद्र

रत्नागिरी ः प्रत्येक घरात वापरात नसलेल्या अनेक वस्तू तशाच पडून असतात. अशा प्रकारच्या जुनी भांडी, जुनी पुस्तके, जुने वापरण्यायोग्य कपडे व चप्पल तसेच ई-कचरा आणि निरुपयोगी प्लास्टिकच्या वस्तू स्विकारणारे आर.आर.आर. केंद्र रत्नागिरी नगरपालिकेत सुरू झाले आहे. २० मे पासून सुरू झालेले हे केंद्र २५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ व ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी नगर परिषदेने या आर.आर.आर. केंद्राची स्थापना केली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रात येणाऱ्‍या वस्तू गरजवंतांना पुरवल्या जाणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ वा. पर्यंत या केंद्रावर वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.
---
तीन रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच

रत्नागिरी : उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या आणखीन तीन एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला स्लीपर श्रेणीमधील एक अतिरिक्त डबा जोडला गेला आहे. पोरबंदर ते कोचुवेली या दरम्यान धावणाऱ्या गाडीला स्लीपरचा एक डबा अतिरिक्त जोडला आहे. पोरबंदर ते कोचुवेली गाडी २५ रोजी धावणार आहे. तर परतीचा प्रवास २८ मे रोजी होईल. याशिवाय कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तिरुअनंतपुरम सेंट्रल ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला वातानुकूलित थ्री टायर दर्जाचा एक अतिरिक्त कोच तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटताना जोडला आहे.
--

तिकीटांसाठी चाकरमान्यांची कसरत

रत्नागिरी : एप्रिल, मे महिन्यात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासाची लगबग सुरू झाली आहे. रेल्वे, बस आणि ट्रॅव्हल्सने हे चाकरमानी परतीच्या प्रवासाकडे लागले आहेत. पहाटे सुटणारी दिवा पॅसेंजर असेल वा इतर मध्य रेल्वेच्या गाड्या सर्व फुल्ल आहेत. एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण २ महिने आधी करूनही १०० ते अगदी ३०० पर्यंत तिकीट वेटिंग दाखवत आहेत. आता महिलांना एसटीत हाफ तिकीट असल्याने एसटीच्या सर्व गाड्याही फुल्ल धावत आहेत. रेल्वेच्या तत्काळ तिकिटासाठी सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लावल्या जात आहेत. त्यातूनही नंबर लावण्यावरून वाद सुद्दा होत आहेत. सकाळी ११ वाजता तत्काळचे तिकीट द्यायला सुरू होते, मात्र पहाटेपासून रांग लागत असल्याने अक्षरशः याठिकाणी झुंबड उडाल्याचे दृश्य गेले आठवडाभर दिसून येत आहे.
-----

कोकण विभागात ५० भरारी पथकं

रत्नागिरी ः यंदा खरीप हंगामात बियाणे, खते आणि निविष्ठांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खतांसह बियाणांतील भेसळ रोखण्याबरोबरच बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी शासनाने कोकण विभागात ५० भरारी पथक स्थापन केली आहे. तसेच तक्रार निवारण कक्ष, तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष आणि संनियंत्रणासाठी विभाग आणि जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. कोकण कृषी विद्यापीठ आणि शासनाचा कृषी विभागाने एकत्रित विचार करून भात लागवडीबाबत विविध उपाययोजना केल्या जातात. त्यातून मोठ्या प्रमाणावर भात उत्पादनात वाढ होत आहे. दरवर्षी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातून भातबियाणांची मागणी वाढली आहे. शासनाच्या कृषी आराखड्यानुसार यंदा हेक्टरी उत्पादन वाढीसाठी विविध नवीन तंत्रज्ञानाचा वापर होऊन उत्पादनात वाढ होईल, अशी तयारी कृषी विभागाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com