
राजापूर कुणबी पतपेढीची निवडणूक जाहीर
राजापूर कुणबी पतपेढीची निवडणूक जाहीर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ः राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी या संस्थेच्या संचालक मंडळाची २०२२-२३ ते २०२७-२८ या पाच वर्षाकरीता निवडणूक जाहीर झाली आहे. तेरा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीचा कार्यक्रम तालुका सहकार निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे यांनी जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर शाखेच्या बैठकीमध्येही चर्चा होवून बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय झाला आहे.
क्रियाशील सभासदांतून तालुक्यातील शाखांसाठी सर्वसाधारण गटासाठी ७, क्रियाशील सभासदांमधून तालुक्याबाहेरील शाखांसाठी सर्वसाधारण १, अनुसूचित जाती जमाती राखीव प्रवर्गातून १, महिलांसाठी राखीव गटातून २, इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून १ व भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव गटातून १ असे तेरा संचालक निवडले जाणार आहेत.
निवडणुकीसाठी २४ ते ३० मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वा. या वेळेत अर्ज भरणे, ३१ मे रोजी छाननी, १ जूनला उमेदवारांची यादी प्रसिद्ध, १६ जून सकाळी ११ वा. निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. २५ जूनला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत मतदान होणार असून २६ जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुधीर कांबळे यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक कार्यालय म्हणून सहाय्यक निबंधकांना निश्चित केले आहे.