टोलमुक्तीसाठी १ जूनची डेडलाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोलमुक्तीसाठी १ जूनची डेडलाईन
टोलमुक्तीसाठी १ जूनची डेडलाईन

टोलमुक्तीसाठी १ जूनची डेडलाईन

sakal_logo
By

04742
ओरोस ः पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदन देताना टोलमुक्त कृती समिती सिंधुदुर्गचे पदाधिकारी.

टोलमुक्तीसाठी १ जूनची डेडलाईन

कृती समितीचा आंदोलनाचा इशारा; पोलिस अधीक्षकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २४ ः सिंधुदुर्गातील जनतेला टोल वसुली सुरू करण्याचे प्रयत्न करून वेठीस धरले तर १ जूनपासून टोलमुक्ती समितीकडून लाक्षणीक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा टोलमुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय परिवहन महामार्ग-६६ च्या झाराप ते खारेपाटण टप्प्याची पूर्वनिर्मिती जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याने केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ठेकेदार नियुक्त करून पथकर वसुलीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या निमित्ताने कुडाळ येथे आयोजित उद्‍घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग शासननिर्मित असल्याने पथकर मुक्त राहील, असे स्पष्ट घोषित केले होते. जिल्ह्यांतर्गत उत्तर-दक्षिण रहदारीसाठी अन्य पथकर मुक्त असा पर्यायी मार्ग उपलब्धच नाही. जो मार्ग एनएच-१७ च्या रुपाने उपलब्ध होता, त्याचेच रूपांतर आता या पथकरयुक्त चौपदरी एनएच-६६ मध्ये केले आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाने व कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार नागरिकांना किमान पायाभूत सुविधा पुरविणे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे; मात्र, या संकल्पनेला छेद देत सिंधुदुर्गाच्या अस्तित्वात असलेल्या हक्काच्या पथकर मुक्त एनएच-१७ ची सुविधा काढून घेऊन त्याबदल्यात पथकराचा भूदंड देणारा चौपदरी महामार्ग जबरदस्तीने वापरण्यास भाग पाडणे कोणत्या दृष्टीने योग्य ठरत नाही? आता टोलमुक्त सिंधुदुर्गसाठी या टोलमधून एमएच ०७ नोंदणी झालेल्या व जिल्ह्यातील पत्यावर परिवहन कार्यालयात नोंदणी झालेल्या अन्य सिरीजच्या वाहनांना टोलमधून वगळावे, अशी आमची ग्राम आणि आग्रही मागणी आहे. तसेच त्याच वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन द्यावा. सिंधुदुर्गातील रहिवाशांना नियोजित पथकरातून मुक्तता द्यावी; अन्यथा उत्तर-दक्षिण साधणारा आमचा पूर्वीचा पथकर मुक्त मार्ग आम्हाला परत करा, अशी विनंती सिंधुदुर्गातील तमाम बांधवांतर्फे करीत आहोत. आमची ही भावना शासनापर्यंत पोहचवावी, अशी विनंती आहे. टोलमुक्तीचे आमचे हे आंदोलन सर्वसमावेशक असून सनदशीर व लोकशाही मार्गाने जाणारे शांततामय आंदोलन आहे; मात्र, शासनाने त्याची दखल न घेतल्यास नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन पोलिस अधीक्षक अग्रवाल यांना सादर केले आहे. यावेळी मनोज वालावलकर, नंदन वेंगुर्लेकर, द्वारकानाथ घुर्ये, संजय भोगटे, श्री. पिळणकर आदी उपस्थित होते.
-----------------
चौकट
अशी होणार कोंडी
पथकरातून महामार्गाचा खर्च वसूल करण्यासही हरकत नाही; मात्र, सिंधुदुर्ग मुख्यालयाची जागा आणि या भौगोलिक नकाशा लक्षात घेतला तर उत्तर भागातील देवगड, वैभववाडी, कणकवली या तीन तालुक्यातील नागरीकरणात जिल्हा मुख्यालय गाठण्यास पर्यायी मार्ग नसल्याने कराने अधिकचा दंड आहे. त्याचबरोबर कोल्हापूरनंतरची कणकवली-फोंडा बाजारपेठ जिल्ह्याची घाऊक किराणा व्यापाराची मुख्य बाजारपेठ आहे. उर्वरीत दक्षिण सिंधुदुर्गातील नागरिकांना या पथकरामुळे अधिकच्या महागाईला सोडावे लागणार आहे.