
विनयभंग करणारा तरुण अटकेत
04795
बाबलो वरक
विनयभंग करणारा तरुण अटकेत
घरालगत पकडले; १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः तालुक्यातील एका युवतीचा विनयभंग करुन व जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाबलो शंकर वरक याला बांदा पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता.२३) रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरालगत ताब्यात घेतले. आज दुपारी त्याला सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, संबंधित पिडीत युवतीच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
शेतातील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेलेल्या युवतीवर बाबलो वरक याने सोमवारी (ता.२२) सायंकाळी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रकार उघड होईल या भीतीने तीला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. मोठ्या शिताफीने त्या युवतीने आपला जीव वाचविला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरुन पसार झाला. सोमवारी रात्रीपासूनच बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह एलसीबीचे पथक संशयिताच्या मागावर होते. संशयित तरुण मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. सर्व शक्यता पोलिसांकडून तपासल्या होत्या. अखेर काल रात्री साडेनऊच्या सुमारास तो त्याच्या राहत्या घराच्या नजीकच पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आज दुपारी संशयिताला पोलिसांनी सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, युवतीवर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे समजते.