
देवगडमध्ये रविवारी मासिक पाळीबाबत जागृती
देवगडमध्ये रविवारी मासिक पाळीबाबत जागृती
देवगड ः तालुक्यात रविवारी (ता. २८) मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी करिश्मा नायर यांनी दिली. या मोहिमेच्या नियोजनाची बैठक आज घेण्यात आली. याबाबत दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर २८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘आम्ही कटिबद्ध आहोत’ ही या सप्ताहाची संकल्पना असणार आहे. या दिनाचे औचित्य साधून २२ ते २८ मे या कालावधीत तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्याबाबत नियोजन बैठक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी तालुक्यातील तज्ज्ञ प्रशिक्षक उपस्थित होते. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरांमुळे मुली -महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर या दिनाचे औचित्य साधून तालुक्यात रॅली, चर्चासत्रे, प्रशिक्षण, प्रबोधन उपक्रमांद्वारे जनजागृती सप्ताह तालुका व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती नायर यांनी दिली.
---
किशोरी पेडणेकरांची ओसरगाव येथे भेट
कणकवली ः मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ओसरगाव येथील तलावाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी ओसरगावच्या मांडावर ग्रामदैवत लिंगमाउली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे दिनेश अपराज, गणेश अपराज आदी उपस्थित होते.