
नेरुरपारला आजपासून भात बियाणे प्रदर्शन
नेरुरपारला भात बियाणे प्रदर्शन
कुडाळः वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त, न्यास वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार यांच्यावतीने २६ ते २८ मे या कालावधीत पारंपरिक भात बियाणे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार कुडाळ येथे होणार आहे. वसुंधराच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे. स्थानिक इच्छुक शेतकरी यात सहभागी होऊन स्वतःकडील पारंपरिक बियाणे प्रदर्शनात मांडू शकतात. या प्रदर्शनास भेट देऊन स्थानिक पारंपरिक बियाण्यांची माहिती व ओळख करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
..............
श्रावणमध्ये धार्मिक कार्यक्रम उत्साहात
मालवणः श्रावण नदीवाडी तरुण हितवर्धक समितीतर्फे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम समाजसेवक अरुण लाड यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्त श्रींची महापूजा, ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व महिलांसाठी ''नदीवाडी क्वीन'' या स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमात पैठणीचा मान विजेत्या दीपाली पवार व उपविजेत्या संगीता वेदरे यांनी पटकावला. दुलाजी परब, डॉ. परब, संजय चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय परब यांनी केले. समितीचे सल्लागार भास्कर परब, दिलीप परब यांनी आभार मानले.
.................
देवलीत आजपासून क्रिकेट प्रीमियर लीग
मालवण, ता. २५ ः देवली गाव आयोजित ''देवली प्रिमियर लीग २०२३'' क्रिकेट स्पर्धा २६, २७, २८ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी २३०२३ रुपये, १७०२३ रुपये तसेच ५०२३ रुपयांची दोन पारितोषिके व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक अशी इतर बक्षिसे आहेत. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास चषक व टी शर्ट देण्यात येईल. ही स्पर्धा वरची देवली मळा मैदान येथे होणार आहे.
....................