
रत्नागिरी-पाच मतदारसंघात पाच मोबाईल तहसीलदार ऑफिस
फोटो ओळी-KOP23M04883
रत्नागिरी ः शासन आपल्या दारी योजनेतील २५ हजार लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाभ देण्यात आला. या वेळी उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई यांच्यासह मान्यवर.
पाच मतदारसंघात मोबाईल तहसील कार्यालय
उदय सामंत; नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.२५ ः जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात अभिनव कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात पाच मोबाईल तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यात ही गाडी गावागावात जाईल. नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज नाही. यामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा, सुविधा मिळाव्यात हाच उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रमोद महाजन क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
२५ हजार लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाभ देण्यात आला. या वेळी मंत्री दादा भुसे, शंभुराजे देसाई, जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी, आमदार पाठक, सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत शासन आपल्या दारी हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी गावागावात जाऊन ही योजना यशस्वी करत आहेत. या लाभार्थ्यांना येथे आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची ही संकल्पना सामान्यांपर्यंत पोचवली जात आहे. शासनाच्या वतीने दाखले मिळायला, धनादेश मिळायला दोन ते चार महिने लागत होते. ती प्रक्रिया एका दिवसात पूर्ण झाली पाहिजे. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पाऊल उचलले आहे. त्याची ही प्रचिती असून हजारो लोक मंडणगडच्या टोकापासून इथे उपस्थित आहेत. अनेक रिक्षाचालक येथे आले आहेत. त्यांची पूर्वीची मागणी होती की, महामंडळ झाले पाहिजे. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना तसे वाटले नाही; पण मुख्यमंत्री शिंदे यांनी रिक्षावाल्यांच्या मागे उभे राहून निर्णय घेत रिक्षाचालकांचे महामंडळ तयार झाले. त्याची अंमलबजावणी दोन महिन्यात होणार आहे. असंघटित कामगारांसाठीही महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणारे हे सरकार आहे. जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधर योजनेचा एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी मोहीम उघडणार आहोत, असे सामंत यांनी सांगितले.
चौकट
टीका करायची हा त्यांचा धंदाच!
मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मी निघालो तेव्हा पत्रकारांनी विचारले तेंव्हा मी एवढेच म्हणालो, आजचा दिवस रत्नागिरीकरांसाठी शुभ आहे. त्यामुळे जे अशुभ बोलले त्यांच्यावर मी काहीच बोलणार नाही. हे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहे. स्वतः काही करायचे नाही; पण टीका मात्र करायची, हा त्यांचा धंदा बनला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत सामंत यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फटकारले.