पावसाच्या तोंडावर गाळ उपसा मोहीम

पावसाच्या तोंडावर गाळ उपसा मोहीम

swt2513.jpg
M04926
सावंतवाडीः मोती तलावात वाढलेली झाडी. (छायाचित्रे ः निखिल माळकर)

swt2516.jpg
04927
सावंतवाडीः मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते नारळ वाढवून मोती तलावातील गाळ उपसा मोहीमेस सुरुवात करण्यात आली.

गाळ उपशाला सापडला मुहूर्त
मोहिमेतून मोती तलाव किती गाळमुक्त होणार?; मंत्री केसरकरांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः ऐन पावसाच्या तोंडावर मोती तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेला आज सुरुवात करण्यात आली. यासाठी तलावाचे पाणी सोडून तो खूप आधीच कोरडा केला होता. मात्र उशिरा सुरु झालेल्या या मोहीमेतून तलाव किती गाळमुक्त होणार हा प्रश्न आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि मंत्री दीपक केसरकर यांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा सावंतवाडीच्या मोती तलावातील गाळ जैसे थेच होता. कठडा बांधणीसह गाळ काढण्याच्या नावावर तलावातील पाणी सोडण्यात आल्याने शहरात पाणी टंचाई जाणवत आहे. दुसरीकडे तलावाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. त्यामुळे गाळ काढण्याची ही मोहीम राबविली जाणार की कागदावरच राहणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आज अचानक या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी स्वतः पाहणी करुन या मोहिमेचा प्रारंभ केला.
येथील मोती तलावातील तीन मुशीकडील गाळ काढताना गेल्यावर्षी संरक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे ती नव्याने उभारण्यात येत आहे. ही सव्वा कोटी रुपये खर्चाची भिंत उभारण्यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आले आहे. या दरम्यान तलावातील गाळ काढण्याबाबत सुतोवाच देखील करण्यात आले. पालकमंत्री चव्हाण, शिक्षणमंत्री केसरकर व सावंतवाडी संस्थानचे राजघराणे आणि नागरीक असे सारे मोती तलावातील गाळ काढण्याबाबत सकारात्मक होते. मात्र चाहूल लागली तरी मोहीम सुरु होत नव्हती.
पाणी सोडल्यामुळे मोती तलावातील गाळ काढण्यासाठी पोषक स्थिती होती. या मोहीमेस आधी दोन अडीच महिने सुरुवात होणे अपेक्षित होते; मात्र प्रशासन ढिम्म होते. आता पावसाळ्याला पंधरा दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता सगळा गाळ काढणे कठीण आहे. गाळ काढण्यासाठी किमान दोन ते तीन महिने दिले तरच मोती तलाव स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो आणि गाळही उपसा होऊ शकतो.
या सर्व पार्श्वभूमिवर आज सावंतवाडीत आलेल्या श्री. केसरकर यांनी मोती तलावाची पाहणी करत गाळ काढण्याच्या मोहीमेला सुरुवात केली. जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते नारळ वाढवून मोहीमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पालिकेचे बांधकाम अधिकारी शिवप्रसाद कुडपकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तानाजी वाडकर आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी जेसीबी मशिन उपलब्ध झाले आहे. आवश्यक ती यंत्रणा वापरुन जेवढे दिवस मिळतील तितका गाळ उपसा करा, अशा सूचना यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या.

चौकट
जिमखाना मैदानाजवळ गाळ टाकणार
तलावातील गाळ कोठे टाकायचा? हा प्रश्न होता. आता हा गाळ जिमखाना मैदानाला लागून असलेल्या सखल भागात टाकण्यात येणार आहे. या भागाचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. तलावात जेसीबी उतरवून मातीचा रॅम्प करत गाळ बाहेर काढण्यात येणार आहे.

चौकट
शहरात पाणी टंचाईचे चित्र
मोती तलावाला भर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शहरातील तलावाकाठच्या बहुतेक विहिरी कोरड्या पडत नव्हत्या. त्यामुळे अनेक नागरिकांना विहिरींचे पाणी उपलब्ध होते. मात्र, यावर्षी विहीरी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराला कुणकेरी-पाळणेकोंड आणि केसरी-चिवारटेकडी तसेच नरेंद्र डोंगरवरून पाणी पुरवठा होत आहे. तो होत असला तरी शहरातील उंचवट्यावर असणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यामध्ये नळाद्वारे पाणी चढत नसल्याच्या वारंवार तक्रारी होत आहेत. त्याबाबतही नगरपरिषदेने उपायोजना आखल्याचे ऐकीवात नाही. यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

कोट
मोती तलावातील गाळ काढण्याचे आदेश दोन मंत्र्यांनी देऊनही तो काढला जात नाही हे दुर्दैव आहे. मोती तलाव सुंदर व्हावा, शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य भविष्यात जाणवू नये, यासाठी तात्काळ याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात.
- अण्णा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते, सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com