
चिपळूण ःरमेश कदम -उदय सामंत भेटीने चर्चाना उधाण
फोटो ओळी
-ratchl254.jpg ःKOP23M04881 चिपळूण ः पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार रमेश कदमांची घेतलेली भेट.
-------------
रमेश कदम-उदय सामंत भेटीने चर्चाना उधाण
राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या ; विकासासह राजकारण
चिपळूण, ता. २५ ः उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी चिपळूणचे माजी आमदार, राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे रमेश कदम पुन्हा एकदा पक्ष बदलणार का? त्यातून चिपळूणची राजकीय समीकरणे बदलणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजकीय समीकरणांची शक्यता कदमांनी मात्र फेटाळून लावली आहे. पालकमंत्र्यांनी पक्षात येण्याची खुली ऑफर दिल्याचे जाहीर केले तरी कदम यांनी राजकीय प्रवेशावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मंगळवारी शासकीय बैठक आटोपल्यानंतर सामंत थेट रमेश कदमांच्या जयेश बंगल्यावर पोहोचले. त्यांच्यासोबत प्रशासनातील काही अधिकारी व निवडक पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी रमेश कदम यांची भेट घेत त्यांच्या कुटुंबाची चौकशीदेखील केली. त्यानंतर मात्र दोघांनी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. आता ही चर्चा राजकीय होती की, शहरातील विकासकामांवर होती याबाबत मात्र कोणताच तपशील समोर आलेला नाही; परंतु या भेटीने राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांच्या भुवया मात्र उंचावल्या आणि चर्चेला तोंड फुटले. रमेश कदम आणि उदय सामंत यांची मैत्री जुनी आहे. सामंत अनेकवेळा माझे मार्गदर्शक म्हणून कदमांचा उल्लेख करतात तसेच हे दोन्ही नेते राष्ट्रवादीत असताना त्यांनी काही राजकीय डावपेच यशस्वी केले होते. त्यामुळे आजच्या भेटीमागे काय याची चर्चा होती.
चौकट
राजकीय विषयांवर चर्चा होतेच
बंद दाराआड जेव्हा चर्चा होते. त्या वेळी राजकीय विषयांवर चर्चा ही होतेच असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. रमेश कदम यांनी यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, भाजप पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रमेश कदम पक्ष बदलणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्व शक्यता फेटाळून लावल्या
रमेश कदम यांनी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे सांगत सर्व शक्यता फेटाळून लावल्या. सामंत हे माझे जुने मित्र असून राजकारणापलीकडे आमचे संबंध आहेत. राजकीय चर्चा होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे कदम यांनी सांगितले.
चौकट
काढायचा तो अर्थ काढा
सामंत म्हणाले, ‘रमेश कदम माझे राजकीय मार्गदर्शक आहेत. त्यांनी यापुढे देखील आमचे मार्गदर्शक म्हणून काम करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे. माझ्या विनंतीला ते मान देतील, असा विश्वास मला आहे. ही थेट शिवसेनेत येण्याची ऑफर आहे का? असे विचारता ते म्हणाले, ‘आपल्याला जो अर्थ काढायचा आहे तो काढू शकता.’