
35 कॅबिनेट बैठकात 350 महत्वाचे निर्णय
पान १ साठी
०४९७१
४९७२
३५ कॅबिनेट बैठकांत ३५० निर्णय
मुख्यमंत्री शिंदे; सरकारी काम, ६ महिने थांब हा शिक्का पुसणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्वराज्याचे सुराज्य व्हावे, चांगले राज्य व्हावे, हे ध्येय उराशी बाळगून राज्याचा कारभार हाकत आहोत. सगळ्यांना माहिती आहे, अडीच वर्षांपूर्वी काय झाले. आपले सरकार स्थापन झाल्यानंतर ३५ कॅबिनेट बैठका घेऊन सर्वसामान्य माणसांच्या हिताचे ३५० निर्णय घेतले. जनतेला चांगले दिवस आले पाहिजेत हाच आमचा अजेंडा आहे. सरकारी काम आणि ६ महिने थांब, ही संकल्पना पुसून टाकायची आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शासन आपल्या दारी, योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रमोद महाजन क्रीडासंकुलात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, माजी आमदार सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘एमएसआरडीने जसा नागपूर-मुंबई रस्ता बनवला आहे, तसा अॅक्सेस ग्रीन फिल्ड रस्ता मुंबई-सिंधुदुर्ग बनवण्यात येणार आहेत. त्याचा डीपीआर तयार केला जात आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुमारे १५ ते २० हजार लाभार्थी आले होते. शासन जनतेच्या हितासाठी निर्णय घेणारे असावे लागते. गेल्या अडीच वर्षांत कारभार पाहिला आहे. सरकार कुठे होते, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही घरी न बसता शासन लोकांच्या दारी, आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीच ही संकल्पना आहे. तालुका, जिल्हा कचेरीत नागरिकांना विविध कामांसाठी चकरा माराव्या लागतात. जनतेचा त्रास कमी व्हावा, यासाठी शासन आपल्या दारी, ही योजना आणली आहे. तालुकापातळीवर कामे होऊ शकतात. जे निर्णय घेतले त्यासाठी काय कागदपत्र पाहिजेत, हे आता थेट तुमच्या दारात येऊन विचारणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून ४२ कोटी रुपयांचा लाभ दिला आहे. त्याला लागणारी कागदपत्रेही येथे दिली जाणार आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘डॉ. अमोल शिंदे यासाठी इथे आले आहेत. मी मुद्दाम लोकांना आता भेटलो. लोकांना आपण काय भेट देत आहोत. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी गावागावांत जात आहेत का, आपला आकडा कसा वाढेल, लाभार्थी कसे होता येईल, सरकारने घेतलेले निर्णय, योजना खरोखर पोहचवायचे असतील तर अधिकारीच महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. लोकप्रतिनिधी आणि शासन ही रथाची दोन चाके आहेत, ती समान वेगाने धावली पाहिजे, तरच राज्याचा विकास होतो. अतिशय चांगले काम करत आहोत. पूर्वीचे स्पीडब्रेकर काढून टाकले आहेत. ऑनलाईन पण नाहीत, फेसबुक नाही, आम्ही बांधावर नाही शेतावर गेलो. मुख्यमंत्रीही शेतावर गेले. प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकारी, सरकार शेतकऱ्याला भेटतंय, हे चांगले संकेत आहेत. सरकारी यंत्रणा अलर्ट होते. त्याचा लाभ नागरिकांना मिळतो, हेच अपेक्षित आहे. २४ तास काम करणार आहोत. यापूर्वीही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून करणार. कामाची सवय बाळासाहेब ठाकरे, दिघेसाहेबांनी लावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुढे नेत आहोत.’’
कौशल्य विकासच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर खासगी कंपन्यांना रोजगार मिळवून देत आहोत. १ लाख २५ हजार एमओयू (करार) झाले होते. केंद्राकडे मल्टिनॅशनल १० हजार कंपन्या आहेत. एकत्र काम केले तर महाराष्ट्रातील गरजू लोकांना रोजगार मिळेल. केंद्र मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सढळ हस्ते मदत करत आहेत. पायाभूत सुविधा देत आहेत.
कोकणसाठी काय काय
मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्षे रखडला; मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातले आहे. लवकरच काम पूर्ण होईल. एमएसआरडीने नागपूर-मुंबई रस्ता बनवला आहे, तसा अॅक्सेस ग्रीन फिल्ड रस्ता मुंबई-सिंधुदुर्ग बनवणार. निम्म्यापेक्षा कमी वेळ अॅक्सेस कंट्रोल रोडमुळे वाचणार आहे. कोयनेचे ६० टीएमसी पाणी वाया जाते. रामदास कदमांचे नाव त्यासाठी घेईन. मंत्री असताना त्याचा पाठपुरावा त्यांनी केला होता. कोकणातील अंतर्गत कामे प्राधिकरण करत आहे. तरुणांना रोजगार देण्यासाठी योजना आहेत. अण्णासाहेब आर्थिक महामंडळातून कर्ज दिले जाते. त्याचे व्याज सरकार भरते. हे सरकार शेतकरी बळीराजा, माता, ज्येष्ठांचे आहे, असे शिंदे म्हणाले.
सामंत, प्रशासनावर कौतुकाची थाप
स्वातंत्र्यवीर सावकर, परशुराम यांच्या स्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या कार्यक्रमाचे पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. कुठल्याही नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली आहे, अशी कौतुकाची थाप मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.