
कानडेवाडी येथे पंपासह मुद्देमालाची चोरी
डामरे कानडेवाडी येथे
पंपासह वायरची चोरी
कणकवली, ता. २५ः डामरे कानडेवाडी येथील शासकीय विहिरीतील १ एचपी पंप, वायर व दोरी असा १७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. याप्रकरणी ग्रामसेवक संजय तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डामरे गावामध्ये सरकारी योजनेतून बांधलेल्या विहिरीवर नळ योजना करण्यासाठी विद्युत पंप बसवणे व नळ योजनेची पाईप लाईन करणे याकरिता श्रीधर कानडे यांनी २०१० मध्ये ग्रामपंचायत डामरेला संमती पत्र दिले होते. त्यानुसार सध्या उन्हाळ्यामुळे डामरे कानडेवाडी येथे नागरिकांच्या सोयीसाठी त्या विहिरीवर १२ मे रोजी १ एचपी विद्युत पंप बसविण्यात आला. या विद्युत पंपाला चंद्रकांत कानडे यांच्या विद्युत मीटर मधून वीज पुरवठा घेण्यात आला. १९ मे रोजी डामरे गावचे सरपंच किरण कानडे यांनी विहिरी वरील पंप, केबल व दोरी चोरीला गेल्याचे चंद्रकांत कानडे यांनी सांगितले. सरपंच किरण कानडे, उपसरपंच सागर साटम यांनी जागेवर जाऊन खात्री केली असता विहिरीवर जोडलेला ओपनवेल पंप, केबल, व दोरी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये १० हजार ८०० रुपये किमतीचा १ एचपीचा लक्ष्मी कंपनीचा पंप, ६ हजार ३०० रुपयांची ७५ मीटर लांबीची वायर व १८० रुपयाची दोरी असा मिळून एकूण १७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी चार संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.