
अवैध वाळू वाहतुकीवर बांद्यात कारवाई
swt२५३८.jpg
०५०२५
इन्सुलीः येथे याच डंपरवर कारवाई करण्यात आली.
अवैध वाळू वाहतुकीवर बांद्यात कारवाई
डंपर पकडलाः महसूल, पोलिसांची संयुक्त मोहीम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर बांदा तपासणी नाका येथे आज सकाळी कारवाई करण्यात आली. या डंपरवर कारवाई करून पुढील कार्यवाहीसाठी सावंतवा़ड़ी तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात आला. ही कारवाई महसूल विभागाचे पथक व येथील पोलिसांनी संयुक्तरित्या केली. एवढी कडक तपासणी असताना संबंधितविनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर कोणाच्या आशिर्वादाने बांदा तपासणी नाक्यापर्यंत आला, यात महसूल खात्यातील कोणाचा हात तर नाही ना, अशी उलट सुलट चर्चा सुरू होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शासनाच्या आदेशानुसार बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका येथे अवैध गौण खनिजाला आळा घालण्यासाठी १० ते ३१ मेपर्यंत विशेष महसूल पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. सायंकाळी मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारा डंपर तपासणीसाठी थांबवून परवान्यांची विचारणा केली असता चालकाकडे परवाना नसल्याचे समोर आले. ड्युटीवर असणारे कोलगाव तलाठी नारायण घृणात व चराठा तलाठी सुप्रिया घोडके या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात कळविली. यावेळी बांदा पोलिस उपस्थित होते. संबंधित वाहन पुढील कार्यवाहीसाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात पाठविण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बांदा पोलिसांकडून इन्सुली तपासणी नाका येथे १० मेपासून गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू आहे. यात काही प्रमाणात कारवाई सुद्धा करण्यात आली. चार दिवसांपूर्वी एका डंपरने थांबण्याचा इशारा केला असतानाही तेथून धूम ठोकली होती. त्यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत बॅरिगेडस लावून कडक तपासणी केली होती; मात्र कडक तपासणी असतानाही आज सकाळी गोव्याच्या दिशेने जाणारा डंपर आला. त्याच्याकडे परवाना नसल्याने पथकाने कारवाई केली.