महाराष्ट्राचा कंठमणी चिंतामण द्वारकानाथ देशमुख

महाराष्ट्राचा कंठमणी चिंतामण द्वारकानाथ देशमुख

१८ (टुडे पान ३ साठी, सदर)

(२० मे टुडे ३)

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो


-rat२६p१.jpg ः
२३M०५०८३
चिंतामण द्वारकानाथ देशमुख
-rat२६p७.jpg ः
२३M०५०८९
प्रकाश देशपांडे
--

महाराष्ट्राचा कंठमणी चिंतामण द्वारकानाथ देशमुख

अन्यायाविरुद्ध पेटून उठणे हा महाराष्ट्र धर्म. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन महाराष्ट्राचे प्रखर तेजस्वी पर्व. भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रावर अन्याय होतेय हे दिसताच सारे मानमरातब आणि अंगावरची राजवस्त्रे भिरकावून मंत्रिपदाचा त्याग करणारे महाराष्ट्राचे कंठमणी ठरले ते चिंतामण द्वारकानाथ देशमुख.
चिंतामणरावांचा जन्म मकरसंक्रांतीला १४ जानेवारी १८९६ ला रायगड जिल्ह्यातल्या नाते इथे झाले. त्यांचे घराणे पिढीजात श्रीमंत. घरी वंशपरंपरेने आलेले देशमुखी वतन. वडील नामवंत वकील होते. रोहा येथे ते वकिली करत होते. मॅट्रिकच्या परीक्षेत चिंतामणराव प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्या या भव्य यशाचे महाराष्ट्राने भरभरून कौतुक केले. गोविंदाग्रज तथा राम गणेश गडकऱ्यांनी चिंतामणरावांचा यशाचे कौतुक करणारी कविता लिहिली. या कवितेत ते म्हणतात.
वंश जाति तव समाज त्यापरी महाराष्ट्र भाषा
आजपासूनी सर्वांनाही तुझी फार आशा
संस्कृतसाठी असलेली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबर्इच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले. इंटरनंतर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. १९१५ ला केंब्रिज विद्यापिठातून बीए झाले आणि १९१८ ला प्रशासनातील नोकरीसाठीची सर्वोच्च पदवी आयसीएस झाले. चिंतामणराव आयसीएस झाले आणि त्यांची मध्यप्रांतात उपआयुक्त म्हणून नेमणूक झाली. इंग्लडमध्ये असतानाच मिस रोझिना सिलकान्स या इंग्रज तरुणीशी प्रेमविवाह झाला. प्रिमरोझ नावाचे कन्यारत्न झाले. १९४९ ला रोझिना यांचे आजाराने निधन झाले. पुढे लवकरच हिंदुस्थान सरकारने त्यांना रिझर्व्ह बँकेत सेक्रेटरी पदावर नियुक्त केले. नंतर डेप्युटी गव्हर्नर आणि पहिले भारतीय गव्हर्नर झाले. कागदी चलनावर त्यांची सी. डी. देशमुख अशी मराठी मनाला अभिमानास्पद वाटणारी स्वाक्षरी दिसू लागली. चिंतामणराव आता सर्वत्र ‘सी. डी. देशमुख’ या नावाने ओळखले जाऊ लागले. इंग्रजी सरकारने त्यांच्या कामाचा गौरव करून नार्इटहूड हा किताब दिला. सी. डी. आता ‘सर सीडी देशमुख’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ११ ऑगस्ट १९४३ ते १९४९ पर्यंत त्यांनी रिझर्व्ह बॅंकेची धुरा सांभाळली.
सी. डी. १९५० ला स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री झाले. १९५२ ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. आपल्या मंत्रिमंडळात लोकनियुक्त अर्थमंत्री असावेत म्हणून पंडित नेहरूंना सी. डी. नी लोकसभा निवडणूक लढवावी, असे वाटत होते; मात्र कुठल्याही राजकीय पक्षाची उमेदवारी स्वीकारायची नाही, हे निश्‍चित ठरवून सीडी अपक्ष म्हणून तत्कालीन कुलाबा आजच्या (रायगड) मतदार संघातून उभे राहिले. त्यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाचे राऊत उभे होते. काँग्रेस पक्षाने सीडीना पुरस्कृत केले होते. स्वतः नेहरू त्यांच्या प्रचाराला आले. सीडी बहुमताने निवडून आले आणि अर्थमंत्री झाले. अर्थमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी विमा कंपन्याचे राष्ट्रीयीकरण केले. इंपिरियल बँकेला स्टेट बँकेचा दर्जा देऊन देशव्यापी केले. अर्थमंत्री या नात्याने नियोजन मंडळाशी जोडले गेले होते. मुख्य म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी केंद्रशासनाची जी पंचवर्षिक योजना सुरू झाली त्यात मोठा वाटा सीडींचा होता. त्यांच्या कार्यकाळात दोन पंचवार्षिक योजनांचे नियोजन झाले.
सीडींच्या प्रथम पत्नी वारल्यानंतर १९५३ ला थोर विदुषी आणि नियोजन मंडळाच्या सदस्या असलेल्या दुर्गाबार्इ यांच्याशी द्वितीय विवाह केला. दुर्गाबार्इ याही सीडींच्या कर्तृत्वाला साजेशा होत्या. त्या मूळ आंध्र प्रांतातील. महात्मा गांधीच्या आदेशानुसार मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला आणि एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगली. कारावासातून बाहेर येताच पुन्हा धडाडीने आंदोलनात सहभागी झाल्याने सरकारने आणखी दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिली होती. सीडी आणि दुर्गाबार्इचे लग्न रजिस्टर पद्धतीने झाले. विशेष म्हणजे या विवाहाचे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली ती भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी.
१९५६ ला देशभर भाषावार प्रांतरचनेचे वादळ घोंगावू लागले. त्या वेळी मुंबर्इ प्रांत द्वैभाषिक होता. स्वतंत्र महाराष्ट्र व स्वतंत्र गुजरात झालाच पहिजे, असे आंदोलन सुरू झाले. त्या वेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व करत होते मोरारजी देसार्इ. या आंदोलनात आणखी एक स्वतंत्र अध्याय सुरू झाला तो म्हणजे मुंबर्इ ही केंद्रशासित करण्याचा. मुंबर्इ ही महाराष्ट्रासाठी अनेकांची कर्मभूमी. असंख्य कोकणवासी मुंबर्इत रोजीरोटी कमवत होते. महाराष्ट्रभर घोषणा निनादली. ‘मुंबर्इ, बेळगाव, धारवाड, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.’ मोर्चे आणि आंदोलनाने महाराष्ट्र धगधगू लागला. मुंबर्इत निघालेल्या प्रचंड मोर्चावर अमानुष गोळीबार करण्यात आला. हुतात्मा चौकात या गोळीबारात १०५ सत्याग्रही बळी पडले. या नृशंस गोळीबाराची चौकशी झाली पाहिजे, ही मागणी संसदेत झाली. काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने ही मागणी नाकारण्यात आली. हे अमंगल होते, हे पाप होते. गोविंदाग्रजांनी १९१२ ला लिहिलेल्या कवितेत म्हटले होते.
पाप अमंगल अनिष्ट किंवा अभद्र जे कांही
स्पर्श तयाचा कधी न होवो तव छायेलाही
सीडी या अमंगलाच्या विरोधात उभे राहिले. राजवस्त्रांची तमा न बाळगता २५ जुलै १९५६ ला संसदेत ‘नेहरूंची ही हुकुमशाही आहे,’ असे सांगून अर्थमंत्रिपदाचे त्यागपत्र दिले. गोविंदाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र भाषेला त्यांच्या यशाची जी आशा होती तिला जागले. संपूर्ण महाराष्ट्राचे जननायक आचार्य अत्रे यांनी ‘चिंतामणी महाराष्ट्राचा कंठमणी झाला,’ अशा शीर्षकाने ‘मराठा’त लेख लिहिला. सीडींनी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांना जागतिक बॅंकेच्या गव्हर्नर पदासाठी निमंत्रण आले; मात्र सीडींनी ते नाकारले. १९६९ ला काँग्रेसपक्ष दुभंगला आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्याविरोधात इंदिराजींच्या पाठिंब्यावर वराहगिरी व्यंकटगिरी उभे राहिले. या निवडणुकीला सीडीही उभे राहिले. पक्षाच्या साठमारीत गिरी निवडून आले. सीडी हैद्राबाद येथे राहायला गेले. सीडी आयसीएस झाले. तेव्हा देशासेवा करायची या ध्येयाने मार्गदर्शन घेण्यासाठी लोकमान्य टिळकांना भेटायला गेले होते. त्यांनी संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी केंद्रीय संस्कृत मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांनी कालिदासाच्या मेघदुताचे मराठीत भाषांतर केले. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजीवर विलक्षण प्रभुत्व होते. सीडींना रोहे गावाची ओढ होती. १९४९ ला रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपद त्यागपत्र दिल्यानंतर इंग्लंडमध्ये वास्तव्य करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी बंगलाही विकत घेतला होता. त्या बंगल्याचे नाव त्यांनी ‘रोहा’ हे ठेवले होते. २ ऑक्टोबर १९८२ ला सीडींनी चिरविश्रांती घेतली. सीडींचा जन्म नाते या गावी ज्या घरात झाला तिथे त्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे. आज ते घर मात्र भिंत खचली/कलथून खांब गेला, अशा जीर्ण स्थितीत कसेबसे उभे आहे जीर्णोद्धाराची वाट बघत.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com