
दाभोळे पूल देतोय अपघातांना आमंत्रण
-rat२६p१३.jpg
२३M०५११६
ः साखरपा ः तीन ठिकाणी कठडा मोडून धोकादायक ठरलेला दाभोळे पूल.
-----------
दाभोळे पूल ठरतोय धोकादायक
अरुंद रस्ता ; तीन ठिकाणी कठडा मोडलेला
साखरपा, ता. २६ ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे गावाला लागून असलेला पूल वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. या पुलाचा कठडा तीन ठिकाणी मोडलेला असून अरुंद रस्त्यामुळे पुलावर वारंवार अपघात होत आहेत.
दाभोळे गावाला लागून महामार्गावर काजळी नदीवरील पूल हा अत्यंत धोकादायक झाला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर वाढलेल्या वाहतुकीमुळे हा पूल आता अरूंद ठरत आहे. या पुलावर अवजड वाहने समोरासमोर आल्यास मोठी वाहतूककोंडी होते. बाराचाकी, चौदाचाकी वाहनांना या पुलावरून नेताना मोठी अडचण येते. या पुलावर समोरासमोर वाहने आल्यास पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. अशावेळी कठड्यावर चढून उभे राहण्याची वेळ अनेकदा पादचाऱ्यांवर आली आहे. याच परिसरात दोन शाळा आणि बाजारपेठ असल्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते.
मागील काही दिवसात या पुलावर सातत्याने अपघात झाले आहेत. गेल्याचा आठवड्यात पुलावर तिहेरी अपघात झाला. सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे पुलाचा कठडा तीन ठिकाणी तुटून खाली नदीपात्रात पडला आहे. या पुलावरील वाहतूककोंडी पाहता हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलासाठी पर्यायी व्यवस्था व्हावी, अशी मागणी पंचक्रोशीतून सातत्याने होत आहे.